घरमुंबईगणेश विसर्जनासाठी नवी मुंबई,पनवेल सज्ज

गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई,पनवेल सज्ज

Subscribe

नवी मुंबई : उद्या मोठ्या उत्साहात नवी मुंबई आणि पनवेल परिसरात गणपती विसर्जन होणार आहे. विसर्जनावेळी होणार्‍या गर्दीचा अंदाज घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई आणि पनवेल पोलीस सज्ज झाले आहेत. नवी मुंंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण ८३१ सार्वजनिक, ८२ हजार ८४४ घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. या परिसरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी एकूण ४०९ सार्वजनिक व २१ हजार ७२० खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच पनवेल विभागात अकरा दिवसांचे ११७ सार्वजनिक आणि खासगी १२,३५४ तर सोसायट्यांचे ३५ गणपती आहेत.

मूर्त्यांची आणि विसर्जनात सहभागी होणार्‍या मंडळांची संख्या लक्षात घेता सुमारे २५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. विसर्जनाच्या कालावधीत ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विविध मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या एकूण ७२ बैठका घेण्यात आल्याचे आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. या परिसरात एकूण ६१ ठिकाणी मूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यापैकी सहा महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.तर ५७३ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून पोलीस विसर्जन मिरवणुकांवर देखरेख ठेवणार आहे.

- Advertisement -

पनवेल महापालिका क्षेत्रात २३ विसर्जनस्थळांवर स्वयंसेवक, तराफे, निर्माल्य कलश यासह प्रथमोपचाराची सोय करण्यात आलेली आहे. त्याशिवाय सर्वच विसर्जनस्थळांवर पालिकेतर्फे फोर्कलिफ्ट उपलब्ध करून दिल्या आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार आणि डॉ. सुरेश कुमार मेकला यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे व परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे यांनी परिसराचा आढावा घेतला आहे. साध्या वेशातील पोलीस, पोलीस मित्र संघटना यांच्याकडूनही संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. तर एखादा अनुचित प्रकार घडल्यास परिस्थिती नियंत्रणासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, वज्र वाहन व स्ट्रायकिंग फोर्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सव शांततेत पार पडला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतही ती शिस्त कायम राहील यात शंका नाही. तरी सुद्धा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍या मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. -अशोक दुधे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -2

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -