घरमुंबईबाप्पा चालले गावाला...

बाप्पा चालले गावाला…

Subscribe

मुंबई : दहा दिवस गणपतीची मनोभावे सेवा केल्यानंतर आज रविवारी आपल्या लाडक्या बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन केले जाईल. यासाठी संपूर्ण मुंबापुरी सज्ज झाली आहे. मुंबई महानगरपालिका, शहर आणि वाहतूक पोलिसांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सकाळपासून मुंबईतील चौपाट्यांवर बाप्पांच्या विसर्जनासाठी गर्दी होणार आहे. विशेष म्हणजे, या विसर्जन मिरवणुकी दरम्यान मुंबईकरांचे लक्ष लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीकडे लागून राहणार आहे. सकाळी साडे दहा वाजता राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. गणेश विर्सजनासाठी सार्वजनिक मंडळांबरोबर पालिकेने यंदाही गिरगाव, जुहू, दादर, गोराई आणि पवई तलाव यासारख्या ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था तयार ठेवली आहे.

लालबागच्या राजाला गरुडरुपी प्रभावळ

LALBAUGCHA RAJA-05
लालबागचा राजा (फोटो- प्रवीण काजरोळकर)

लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा पर्यावरण विषयावर देखावा सादर केला. यात वनातील मोर, वाघ, हत्ती असे प्राणी बाप्पांना सोबत करण्यासाठी मंडपात हजर झाले. महत्वाची बाब म्हणजे यंदाच्या वर्षी बाप्पांच्या मूर्ती मागील भागात प्रभावळ नव्हती. यावेळी बाप्पा हे एका खडकावर विराजमान झाले होते. मात्र आज विसर्जनाच्या दिवशी बाप्पांसाठी एक विशेष वेगळी प्रभावळ साकारण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत बाप्पाला ही गरुडरुपी वेगळी आकर्षक अशी प्रभावळ लावण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

- Advertisement -

या प्रभावळ संदर्भात बोलताना लालबागच्या राजाचे मूर्तीकार संतोष कांबळी म्हणाले, यंदाच्या वर्षी बाप्पांच्या विसर्जनासाठी ही विशेष वेगळी गरुडरुपी प्रभावळ बनवण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाच्या हातात शंख असून हा विष्णुरूपी अवतार असल्यामुळे गरुडरुपी प्रभावळ बनवण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, रविवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून तब्बल २० तासांपेक्षा अधिक वेळ मिरवणूक होणार आहे. गेल्या वर्षी लालबागच्या राजासाठी एक विशेष वेगळा तराफा तयार करण्यात आला होता. ज्यात बाप्पांची मूर्ती बसवून गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठलाच्या प्रतिकृतीतून पुष्पवृष्टी

vitthal

- Advertisement -

मुंबईत रविवारी रंगणार्‍या विसर्जन मिरवणुकीसाठी सार्वजनिक मंडळांबरोबरच पृष्पवृष्टी मंडळाने जय्यत तयारी केली आहे. बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान बाप्पांवर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून बाप्पांचे स्वागत केले जाते. लालबाग परिसरात श्रॉफ बिल्डिंग जवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचा देखावा उभाण्यात आला आहे. तर चिंचपोकळी येथे स्थानिक हनुमान उत्सव मंडळाद्वारे विठ्ठलाच्या प्रतिकृतीद्वारे बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरवर्षी मंडळांकडून तब्बल ४०० हून अधिक बाप्पांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाते. यंदाच्या वर्षी ६०० किलो फुले आणि ४०० किलो गुलालचा वापर केला जाणार आहे.

विसर्जन मिरवणुकीला पोलिसांचे कवच

POLICE-SECURITY--02

मुंबईकरांच्या आर्कषणाचे केंद्रबिंदू ठरणार्‍या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसाठी यंदाही मुंबई पोलिसांनी विशेष पोलीस बंदबोस्त तैनात ठेवला आहे. या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून तब्बल ५५० पोलिसांची टीम काम करणार आहे. २० तासांहून अधिक काळ चालणार्‍या मिरवणुकीसाठी ८० पेक्षा जास्त अधिकार्‍यांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विसर्जनादरम्यान बाप्पांच्या मिरवणुकीवर ड्रोन कॅमेर्‍यातून नजर ठेवली जाणार आहे.

विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल

रविवार सकाळपासून सुरू होणार्‍या विसर्जनादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील काही मार्ग बंद करण्यात येणार आहेत. महत्वाचे असणारे आणि विसर्जनासाठी वापरण्यात येणारे एकूण ५३ रस्ते बंद असणार आहेत. तर एकूण ५६ रस्त्यावरील वाहतूक एकतर्फी मार्गावरुन सुरू असणार आहे. त्याचबरोबर १८ मार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतली ९९ पार्कींगची ठिकाणे बंद असणार आहेत. वाहतूक विभागाच्या एकूण ३१६१ पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. तर विसर्जनासाठी महत्वाच्या मानल्या जाणार्‍या भागांवर पोलीस ड्रोन कॅमेर्‍याच्या माध्यमातून नजर ठेवणार आहेत.

या रस्त्यावरील वाहतूक बंद

दक्षिण मुंबईतले महत्वाचे असे नाथाभाई पारेख मार्ग, जिनभाई राठोड मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग. व्ही पी रोड, बी जे रोड,सी पी टँक मार्ग, दुसरा कुंभारवाडा मार्ग, संत सेना मार्ग, दुसरी सुतार गल्ली, नानुभई देसाई मार्ग, पंडित रमाबाई मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस.एस राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, सानेगुरुजी मार्ग, डॉ.ई. बार्जेस मार्ग आणि जेराबाई वाडिया मार्ग हे रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.

मध्य आणि पूर्व उपनगरातील

रानडे रोड,शिवाजी पार्क रोड,केळुस्कर रोड,न.ची.केळकर मार्ग,(दक्षिण आणि उत्तर),एम बी राऊत मार्ग,टिळक ब्रिज,गिडवाणी मार्ग, घाटलागाव,लालबहादूर शास्त्री मार्ग,भट्टीपाडा मार्ग, जंगल मंगल मार्ग, दीनदयाळ उपाध्याय मार्ग आणि सर्वोदय नगर येथील रस्त्यावरील वाहतूक बंद असणार आहे.

पश्चिम उपनगरातील

लिंक रोड, टागोर रोड, जुहू रोड, जुहू तारा रोड, शामराव परुळेकर रोड, जनार्दन म्हात्रे रोड, आरे कॉलनी रोड, एस व्ही रोड, महात्मा गांधी रोड (कांदिवली) जे.पी.रोड, पंच मार्ग आणि लोकमान्य टिळक मार्ग बोरिवली हे रोड विसर्जनासाठी बंद असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -