घरमुंबईनवी मुंबईत अख्खे गावच गायब

नवी मुंबईत अख्खे गावच गायब

Subscribe

राज्याच्या महसूल दफ्तरी नोंद आहे पण प्रत्यक्षात गावच नाही

सोन्या, चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू, गाडी, अगदी विहिरही गायब झाल्याचे आपण ऐकले, वाचले असेल. पण गावच गायब झाल्याचे कधी ऐकले आहे का? या तंत्रज्ञान युगात काहीही होऊ शकते, त्याची प्रचिती नवी मुंबईत आली आहे. येथील एक अख्खेच्या अख्खे गावच गायब झाले आहे. विशेष म्हणजे महसूल दप्तरी या गावाची नोंद आहे, पण प्रत्यक्षात ते गावच गायब आहे. आताच्या घणसोलीतील सावली असे त्या गावाचे नाव आहे. काळरात्रीने सावलीची सावलीच हिरावून घेतली आहे.

नवी मुंबईच्या घणसोलीतील सावली नावाचे हे गाव. येथील ग्रामस्थांना हटवून महापालिकेकडून भव्य सेंट्रल पार्क नावाचे उद्यान बनवण्यात येणार आहे. या गावाचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सिडकोला ताबा देण्यात आला नसतानाही सिडकोकडून १९७०च्या दशकात सावली गाव उद्ध्वस्त करण्यात आले.

- Advertisement -

कोपरखैरणे आणि घणसोलीच्या मधोमध सावली गावातील शेतकर्‍यांची घरे होती. सध्या या जागेवर महानगरपालिका भव्य अशा उद्यानाची निर्मिती करत आहे. घणसोली रेल्वेस्थानकांच्या अगदी समोर मोक्याच्या जागेवर असलेले हे गाव आपल्या अस्तित्वाचा शोध घेत आहे. जमाबंदी आयुक्त महसूल विभागाच्या कागदपत्रांवर सावली गावाचे पुनर्वसन केल्याची माहिती विकास संस्थेला देण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रत्यक्षात मात्र या गावाचे पुनर्वसन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे, हे कोणीही सांगायला तयार नाही. कोपरखैरणे घणसोलीच्या मधोमध असलेल्या सावली गावात यापूर्वी आठ घरांचे अस्तित्व असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र सिडकोने कारवाई करून ही घरे पडल्यावर आता या गावाचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.

सावली आणि चिंचवली ही दोन गावे सिडकोच्या जमीन संपादन प्रक्रियेतच उद्ध्वस्त झालेली आहेत. सावली गावाच्या अवतीभोवती शेती मोठ्या प्रमाणात असल्याने या गावामध्ये शेतीची राखणदारी करण्यासाठी छोटी घरे बांधण्यात आली होती. उन्हाळ्यात नगदी पीक म्हणून भाजीपाला पिकवणारा तसेच भूमिपुत्रांना सावली देणारा म्हणून या गावाचे नाव सावली असे पडले होते. या गावाच्या अगदी समोर सावली दर्गा म्हणून ओळखला जाणारा पीर दर्गा आता चांगलाच भव्य झाला आहे.

उत्तरेकडे एक देवीचे मंदिर आहे. पूर्व आणि पश्चिम बाजूस शेती पसरलेली होती. या दोन दैवतांचे पूजन केल्यानंतरच येथील शेतीची मशागत किंवा कापणी केली जात होती. या गावाची अर्धी हद्द ही एमआयडीसीत असल्याने घणसोली आणि कोपरखैरणेतील अनेक शेतकर्‍यांची जमीन एमआयडीसीने संपादित केलेली आहे. सध्या अस्तित्वात असलेले घणसोली रेल्वे स्थानक हे खर्‍या अर्थाने सावली गावाच्या हद्दीत आहे. आज घणसोली रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाणार्‍या सावली गावाची सावलीच उद्ध्वस्त झाली आहे.

सावली गावाचा भूखंड हा सिडकोकडून पालिकेकडे हस्तातंरित झाला आहे. त्या अगोदर सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. भूखंड काय म्हणून हस्तांतरित झाला आहे हे मालमत्ता विभागाकडून समजेल. – महेंद्र कोंडे, जनसंपर्क अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका

सावली गाव हे शहराच्या मोक्याच्या जागेवर असल्याने त्या जागेवर अनेक भूमाफियांचा डोळा होता. गावावर कारवाई करण्यात आली. अनेक गावांचे गावपण हिरावून गेल्यावर आज फक्त गावांची नावे शिल्लक राहिली आहेत. यासाठी गावांचे गावपण आणि प्रकल्पग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा न्यायालयीन लढा लढण्यात येईल.
-विकास पाटील,समाजसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -