घरमुंबईनवरात्रीमुळे फुलबाजारात उत्साह, झेंडू ५० रुपये किलो

नवरात्रीमुळे फुलबाजारात उत्साह, झेंडू ५० रुपये किलो

Subscribe

गतवर्षीच्या तुलनेत मात्र भाव कमीच

पितृपंधरवडयात कोमेजलेला फुलबाजार नवरात्रीच्या सुरुवातीलाच उत्साहाने फुललेला दिसला. मात्र यंदा फुलांची आवक अधिक प्रमाणात असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत सणासुदीच्या काळात फुले स्वस्तच होती, असे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकार्‍यांनी सांगितले आहे.नवरात्रीत झेंडू ५० रुपये किलोने विकला जात आहे. गणेशोत्सव काळात ४०० रुपये किलोने विकली जाणारी गुलछडी नवरात्रोत्सवात ३५ रुपयांवर आली आहे. हे भाव दसर्‍याच्या आदल्या दिवशी नक्कीच वधारतील अशी माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली. नवरात्रोत्सवात फुलांना मोठी मागणी असते. ठाणे, नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी जुन्नर, नाशिक, नगर या भागांतून येणारी फुले विक्रीसाठी उपलब्ध होतात.

तसेच बंगळूरु, गुजरात येथून आलेल्या फुलांचा पुरवठाही होतो. या वर्षी फुलांची आवक अधिक असल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक होऊ लागला होता. गणपतीत भाव कधी नव्हे इतके घसरले होते. त्यानंतर गणपती उत्सवात किरकोळ बाजारात गोंडा २०० रुपये किलोने विकला जात होता. पितृपंधरवड्यात मात्र ग्राहकांकडून फुलांची मागणी कमी झाली. त्यामुळे झेंडू ५ रुपये किलो दराने विकला जात होता. नवरात्रोत्सवात मात्र किरकोळ बाजारात ५० रुपये किलोने झेंडू विकला जात आहे. आवक अधिक असल्याने अनेक शेतकर्‍यांनी पितृपंधरवड्यात फुले माळशेज घाटात फेकून दिली होती.

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या तुलनेत पावपटच दर मिळाल्याने फूलविक्रेत्यांची निराशा झाली आहे.
-गणेश हांडे, शेतकरी

सध्या घाऊक बाजारात १०० रुपये किलोने विकली जाणारी शेवंती किरकोळीत मात्र १२० रुपये किलोने विकली जात आहे. गणेशोत्सव काळात याच शेवंतीचे भाव किरकोळीत २५० रुपये किलो होते. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत हेही भाव कवडीमोलच होते.
-भुजंग पाटील, फुल विक्रेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -