घरमुंबईउत्तर प्रदेशचे मुस्लीम कुटुंब साकारते  मुंबईतील रावण

उत्तर प्रदेशचे मुस्लीम कुटुंब साकारते  मुंबईतील रावण

Subscribe

गुरूवारी साजरा होणार्‍या दसरा सणासाठी गिरगाव चौपाटीवर रावण साकारताना नवाबुद्दीन तिरगर.

आपल्या देशात हिंदू-मुस्लीम ऐक्यावर नेहमीच चर्चा होत असते. मात्र ऐक्य व्हावे यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशी परिस्थिती असताना, दुष्ट प्रवृत्तीचा म्हणून ओळखला जाणारा रावण आज एका मुस्लीम कुटुंबाला हिंदूंशी जोडण्याचा आनंद मिळवून देत आहे. दसर्‍याला जाळल्या जाणार्‍या रावणाचे पुतळे घडवण्यासाठी तिरगर हे उत्तर प्रदेशमधील मुस्लीम कुटुंब दरवर्षी दसर्‍याच्या २० दिवस अगोदर मुंबईत येते. मुंबईत ठाण मांडून रावणाचे पुतळे घडवते. त्यातून मिळणार्‍या बिदागीपेक्षा  समाधान मोठे असते, असे हे कुटुंब मोठ्या विश्वासाने सांगते.
वेगाने बदलणार्‍या जगामध्ये अनेक तरुण पिढीजात कला आणि व्यवसायामध्ये सहभागी होण्यास फारसे तयार नसतात. परंतु गिरगाव चौपाटी आणि आझाद मैदानात दरवर्षी दसर्‍याच्या दिवशी दहन करण्यात येणारा रावण साकारणार्‍या कुटुंबातील तरुण पिढी मोठ्या उत्साहाने ही कला जोपण्यास दरवर्षी पुढाकार घेत आहे. त्याचे कारण म्हणजे या कुटुंबातील प्रत्येक पिढीवर हिंदू-मुस्लीम ऐक्याचे संस्कार झाले आहेत. ‘आमच्या कुटुंबाला रावण साकारण्याच्या माध्यमातून हिंदू कुटुंबाशी जोडल्याचा मोठा आनंद वर्षानुवर्षे मिळत आहे,’ असे गिरगाव चौपाटीवर रावण साकारत असलेले ३८ वर्षीय  नवाबुद्दीन तिरगर सांगतात.
उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील चिठेरा दादरी गावातील नवाबुद्दीन तिरगर यांच्या अनेक पिढ्या दरवर्षी दसर्‍यामध्ये दहन करण्यात येणारा रावणाचा पुतळा साकारत आहेत. पुतळा साकारण्याची ही कला त्यांच्या घरातील प्रत्येकाच्या अंगात जन्मजातच आहे. ही कला शिकण्यासाठी त्यांनी कोणताही कोर्स केला नाही किंवा कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही. नवाबुद्दीन व त्यांचे भाऊ आपल्या वडिलांकडून रावणाचा पुतळा घडवण्याची कला शिकले. वडील रावणाचा पुतळा बनवताना हे भाऊ त्यांना मदत करत होते. त्यातूनच नवाबुद्दीन आणि त्यांचे भाऊ रावणाचा पुतळा बनवण्यास शिकले. नवाबुद्दीन यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. तर त्यांचा एक भाऊ ड्रायव्हर, एक भाऊ महाविद्यालयात शिकत आहे, तर अन्य भावंडांचाही नोकरीधंद्यात चांगला जम बसलेला आहे.
असे असले तरी दरवर्षी हे कुटुंब महिनाभर आपला कामधंदा पूर्णत: बंद करून दसर्‍याच्या 20 दिवस अगोदर मुंबईत रावणाचा पुतळा बनवण्यासाठी येतात. नवाबुद्दीन यांनी यावर्षी 10 ते 12 रावणांचे पुतळे साकारले आहेत. हे पुतळे 10 फुटांपासून 50 फुटांपर्यंत उंच आहेत. गिरगाव चौपाटीवरील रावण हा 50 फूट उंच आहे. येथे बनवण्यात आलेल्या रावणाचे पुतळे आझाद मैदान आणि मालाड येथेही पाठवण्यात येणार आहेत.
आझाद मैदानावर दहन करण्यात येणारा रावणाची प्रतिकृती नवाबुद्दीन यांचे कुटुंबिय 10 वर्षांपासून साकारत आहेत. तर दोन वर्षांपासून गिरगाव चौपाटीवरील रावणाची प्रतिकृती ते साकारत आहेत. नवाबुद्दीन यांच्या कुटुंबातील 12 जण गिरगाव चौपाटीवर दोन आठवड्यांपासून पुतळे बनवत आहेत. नवाबुद्दीन यांच्यासोबत त्यांचे भाऊ हफिजुद्दीन, सासरे मोहम्मद अख्तर खान व अन्य कुटुंबिय मुंबईत आले आहेत. विशेष म्हणजे नवाबुद्दीन यांचा लहान मुलगा आलमही आपल्या वडिलांसोबत पुतळा साकारण्यासाठी मुंबईत आला आहे. आलमला रावणाचा पुतळा बनवण्याच्या निमित्ताने शाळेत शिकवण्यात येत असलेल्या हस्तकलेचे काम करण्याची संधी मिळत असल्याने तो खूश आहे. नवाबुद्दीन यांच्या कुटुंबासोबत पाच-सहा कारागिरांचाही हातभार लागत आहेत.
रावण बनवण्याच्या या कलेतून आम्हाला फारसे पैसे मिळत नाहीत. परंतु आम्ही बनवलेल्या रावणाच्या पुतळ्याच्या दहनामुळे हिंदू धर्मातील नागरिक आनंद व्यक्त करतात. आमच्या कलेमुळे त्यांना होत असलेल्या आनंदामुळे आम्हाला हिंदुंशी जोडल्याचे समाधान मिळते. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी आम्ही ही कला जाणीवपूर्वक जोपासण्याचा प्रयत्न करतो.
-नवाबुद्दीन तिरगर, रावणाचा पुतळा घडवणारा कलाकार

शाळा आणि कला 

नवाबुद्दीन यांचे सासरे मोहम्मद अख्तर खान हे उत्तर प्रदेशमध्ये शाळा चालवतात. जावयाची पिढीजात कला टिकून राहावी यासाठी ते आपल्या व्यवसायातून वेळ काढून जावयासोबत मुंबईमध्ये आले आहेत. या कामातून सुख मिळत असल्याचे मोहम्मद खान सांगतात. 
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -