घरमुंबईएनसीबीच्या अधिकार्‍याला अडीच किलोमीटर फटफटत नेले

एनसीबीच्या अधिकार्‍याला अडीच किलोमीटर फटफटत नेले

Subscribe

एका ड्रग्स सप्लायरला अटक

ड्रग्स सप्लायरचा पाठलाग करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या एका अधिकार्‍याला मोटारसायकलवर असलेल्या ड्रग्स सप्लायरने अडीच किलोमीटर फरफटत घेऊन गेल्याची घटना गुरुवारी अंधेरीच्या वीरा देसाई रोड या ठिकाणी घडली. अडीच किलोमीटरच्या पाठलागानंतर तिघांपैकी एकजण एनसीबीच्या हाती लागला आहे. या सर्व घटनेत एनसीबीचा एक अधिकारी जखमी झाला आहे. अटक केलेल्या ड्रग्स सप्लायरकडून एनसीबीने 62 ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला आहे.

अंधेरी पश्चिम विरा देसाई रोडवर असलेल्या इनोसेन्ट व्हायरस एज्युकेशन जवळ, एबीसीडी शॉप या ठिकाणी ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबीच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी दुपारी सदर ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, दोन मोटारसायकलवरून आलेल्या तिघांना संशय येताच त्यांनी मोटारसायकल पुन्हा वळवली. ड्रग्स सप्लायर पळून जात असल्याचे बघून एनसीबीच्या अधिकार्‍यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला, एका अधिकार्‍याने ड्रग्स सप्लायरची मोटरसायकल मागून पकडून ठेवली होती.

- Advertisement -

पकडले गेल्याच्या भीतीने या ड्रग्स सप्लायरने तशीच मोटारसायकल दामटवली आणि अडीच किलोमीटरपर्यंत एनसीबीच्या अधिकार्‍याला फरफटत नेले. त्यानंतर या ड्रग्स सप्लायरने मोटारसायकल सोडून एका निवासी इमारतीत धाव घेतली. त्याच्या पाठोपाठ एनसीबीच्या अधिकार्‍याने त्याचा पाठलाग करीत त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याचे इतर दोन साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरले. अडीच किलोमीटर फरफटत घेऊन गेल्यामुळे एनसीबीचा एक अधिकरी जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. अटक केलेल्या ड्रग्स सप्लायरकडून एनसीबीने 64 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या इतर दोन साथीदारांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती वानखेडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -