घरमुंबईब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी गुलाबी प्रकाश झळाळी

ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी गुलाबी प्रकाश झळाळी

Subscribe

नवी मुंबई:- ऑक्टोबर महिना हा स्तनाचा कर्करोग जनजागृती महिना म्हणून जगभरात साजरा केला जातो. या आजाराशी लढण्याचे द्योतक म्हणून गुलाबी रंग प्रतिक मानला जातो. 19 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत जनजागृती म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयकॉनिक मुख्यालय इमारतीवरील मोठ्या घुमटाला गुलाबी रंगाची प्रकाश झळाळी देण्यात येणार आहे.

ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे योग्यवेळी तपासणी होणे गरजेचे आहे. लवकर निदान आणि योग्य उपचाराने या आजारावर मात करता येऊ शकते. हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने जनजागृती व्हावी याकरिता महानगरपालिकेने हे सकारात्मक पाऊल उचलेले आहे. याकामी अपोलो हॉस्पिटल्सने पुढाकार घेतला असून त्यांच्यामार्फत महानगरपालिकेच्या 45 वर्षांवरील महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता महापालिका मुख्यालयात 19 व 20 ऑक्टोबरला ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

भारतात महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण इतर कर्करोगांपेक्षा जास्त आहे. लवकर निदान झाल्यास उपचाराने निरोगी जीवन जगता येते. निदानच उशीरा झाल्यास उपचाराला प्रतिसाद मिळण्याची क्षमता कमी होते. हे लक्षात घेऊन अपोलो हॉस्पिटल्स त्यादृष्टीने जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहे. तशी माहिती हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय प्रमुख डॉ. नरेंद्र त्रिवेदी यांनी दिली. या काळात जनजागृती म्हणून नागरिकांनी गुलाबी रंगाचे कपडे वापरावेत असे आवाहन त्यांनी केले आहे.

महानगरपालिकेची मुख्यालय इमारत ही आयकॉनिक मानली जात असून या परिसरात येणार्‍या नवी मुंबईकर व प्रवासी नागरिकांचे आकर्षण केंद्र आहे. त्यामुळे जागतिक स्तनाचा कर्करोग महिना म्हणून 19 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत गुलाबी प्रकाशात झळाळणार्‍या मुख्यालय वास्तूवरील घुमटाला पाहून जनतेत ब्रेस्ट कर्करोगाची वेळेत तपासणी करण्याविषयी जागरूकता येईल, असा विश्वास महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -