घरमुंबईमुंबई विद्यापीठात आता सीएनजी वाहनेच

मुंबई विद्यापीठात आता सीएनजी वाहनेच

Subscribe

वाढती महागाई आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी घेतला निर्णय

मुंबई:-मुंबईसह देशभरात वाढत असलेल्या महागाईमुळे विशेषत: इंधन दरवाढीमुळे कॉलेजानंतर आता मुंबई विद्यापीठाच्याही तिजोरीवर भार बसण्यास सुरुवात झाली आहे. यातून मार्ग काढताना आता विविध खर्चात कपात केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने पर्यावरणाचे हित लक्षात घेता नवे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या निर्णयानुसार यापुढे मुंबई विद्यापीठात सीएनजी गाड्याच विकत घेण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला मॅनेजमेंट कौन्सिलने हिरवा कंदील देखील दर्शविला आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

देशभरात सध्या महागाईने डोके वर काढले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक घडी बसविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात प्रामुख्याने इंधन दरवाढीमुळे सामान्य मुंबईकर त्रस्त झाले आहेत. त्याचीच झळ विविध संस्थांना देखील बसत असून मुंबई विद्यापीठ देखील त्यातून वाचू शकलेला नाही. त्यातच मुंबई विद्यापीठात गेल्या काही वर्षांपासून आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही.

- Advertisement -

आजच्या घडीला कॉलेजांकडून येणारी सुमारे १०० कोटींहून अधिक संलग्न फी विद्यापीठाकडे आलेली नाही. तर सरकारकडून वेतनेत्तर अनुदान म्हणून येणारा निधीही विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे लटकला आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाने आता अनेक खर्च कपात केले आहेत. किंबहुना म्हणूनच मुंबई विद्यापीठाने वाहनांवर होणारा खर्च कमी करण्याचा पण केला आहे. या निर्णयानुसार आता विद्यापीठ प्रशासनाने यापुढे सीएनजी गाड्या विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी गाड्यांसाठी खर्च कमी होणार असल्याने विद्यापीठाने हा निर्णय घेतल्याचे कळते. सध्या पेट्रोलची किंमत ८८.२९ रुपये आहे तर डिझेलची किंमत ७९.८४ इतकी आहे. तर सीएनजी ४९ रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर होणरा खर्च कपात करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने यापुढे सीएनजीवर चालविणार्‍या गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना विद्यापीठाने सर्व वाहने व चालक सामान्य प्रशासन विभागाच्या नियत्रंणाखाली असावीत, असाही निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरणदृष्ष्ट्या सीएनजी गाड्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. तर याचवेळी विद्यापाठातील विभागांकडून होणारी ओला, उबेर किंवा भाडेत्तत्वांवर गाड्या वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण या गाड्या वापरताना विद्यापीठाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करण्याची सूचनाही यावेळी मॅनेजमेंट कौन्सिलकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

भंगार ही मार्गी लावा

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट आणि कलिना कॅम्पस येथील विविध विभागात वस्तू जुन्या झाल्याने त्या भंगारात काढल्या आहेत. या भंगारात काढलेल्या या वस्तू मोठ्या प्रमाणात कॅम्पसमध्येच पडून असल्याची माहिती यावेळी समोर आली आहे. त्यामुळे याची ही गंभीर दखल विद्यापीठाने घेतल्याचे पुढे येत आहे. विविध विभागात असलेल्या या भंगाराची योग्य प्रकारे तातडीने विल्हेवाट लावण्याचे फर्मान विद्यापीठाने यावेळी दिले आहेत. यासाठी विशेष भंगार समिती नेमण्याचे आदेशही यावेळी मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत दिल्याची माहिती ‘आपलं महानगर’च्या हाती आली आहे. विद्यापीठासमोर असलेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेताच हा निर्णय घेतल्याचे कळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -