घरमुंबईCyclone Tauktae: आजही पावसाची शक्यता, खबरदारी बाळगण्याचे महापौरांकडून आवाहन

Cyclone Tauktae: आजही पावसाची शक्यता, खबरदारी बाळगण्याचे महापौरांकडून आवाहन

Subscribe

तौक्ते चक्रीवादळाने मुंबईसह इतर भागातील नागरिकांची तारांबळ उडवली. सोमवारी मुंबई किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाने चांगलेच झोडपले. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसराची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या वादळाचा तडाखा खूप मोठा असल्याचे सांगितले. तर गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी जेटीवॉलचे तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झालं असल्याची माहिती त्यांनी दिली. यासह आजही मुंबईत पावसाची शक्यता असून मुंबईकरांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन देखील केले आहे.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या साफसफाई मोहिमेची पाहणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज केली. याप्रसंगी ऐ विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती चंदा जाधव तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीचा हवाला देत महापौर यांनी असेही सांगितले की, आजही मोठ्या प्रमाणात हवा आहे, पावसाची आजही शक्यता आहे आणि समुद्र खवळलेला आहे. हे सर्व पाहता आपण एक नागरिक म्हणून खबरदारी घेणं आवश्यक आहे. सोमवारी चक्रीवादळामुळे रस्त्यात पाणी साठले तर झाडं कोसळल्याचेही कित्येक प्रकार घडले आणि नुकसानही झाले आहे. त्यामुळे आज मुंबईची साफ-सफाई व्हावी, यासाठी आज सकाळपासून सुरूवात झाल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह या ठिकाणी समुद्राचे रौद्र रूप पाहायला मिळाले. या स्थितीचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज होती. यामुळे संकट मोठं असूनही त्याचा समर्थपणे प्रतिकार करता आला. एकीकडे मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल नियंत्रण कक्षातून स्थितीवर लक्ष ठेवून होते तर महापौर किशोरी पेडणेकर या काल आणि आज थेट फील्डवर उतरल्या असून त्यांनी गेट वे ऑफ इंडियासह काही भागाची पाहणी करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमी किशोरी पेडणेकर यांनी काल सोमवारी मुंबईतील काही भागांची पहाणी केली होती. यावेळी त्यांनी वरळी सी फेस आणि गेट वे ऑफ इंडिया भागात त्यांनी हजेरी लावली होती. तौक्ते चक्रीवादळ व पावसाची सुरु असलेली सततधार लक्षात घेता, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी सी फेस येथे पाहणी करताना मुंबईकर नागरिकांनी उगाच धाडस करू नये, अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन केले होती.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -