घरमुंबईसफाळयात पोस्ट ऑफिसचे व्यवहार ठप्प

सफाळयात पोस्ट ऑफिसचे व्यवहार ठप्प

Subscribe

सर्व्हरमध्ये बिघाड आल्याने 14 ऑक्टोबरपासून सफाळे येथील पोस्ट ऑफिसचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे दैनंदिन कामकाजावर मोठा फटका बसला असून नागरिकांना दररोज तासनतास कार्यालयाबाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे.

आधुनिकतेच्या युगात इंटरनेटच्या माध्यमामुळे दररोज नवनवीन क्रांती होत असताना सर्वांशी नाळ जोडलेले पोस्ट खाते दिवसेंदिवस डबघाईला जात आहे. अशातच शासनाच्या काही निवडक विश्वासाहार्य योजनांमुळे थोड्याफार प्रमाणात शहरी व ग्रामीण भागात पोस्ट ऑफिस सुरू आहेत. काही वर्षांपासून पोस्ट खात्यातही इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने बरेच व्यवहार सध्या व सोप्या पद्धतीने होऊ लागले. मात्र इंटरनेटमुळे जितकी सुविधा वाढली आहे. मात्र, कनेक्शन विस्कळीत झाल्याने असुविधाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी इंटरनेट बंद पडल्याने 5 दिवस कामकाज ठप्प झालेल्या सफाळे पोस्ट ऑफिसवर पुन्हा संकट कोसळले आहे. 14 ऑक्टोबरपासून येथील सर्व्हरमध्ये मोठी बिघाड झाल्याने पोस्टाचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मागील चार दिवसांपासून रजिस्टर स्पीड पोस्ट, पार्सल, विविध योजनांचे कॅश डिपॉझिट तसेच आरडीचे डिपॉझिट असे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. परिसरात आरडीचे एकूण 36 एजंट असून त्यांच्यासह विविध कामकाजासाठी दररोज नागरिकांच्या रांगाच्या रांगा लागत असून व्यवहार सुरू न झाल्याने सर्वांना आल्या पावली परतावे लागत आहे.

नोएडा येथील टीसीएसच्या माध्यमातून एक सॉफ्टवेअर बसवले असून त्या सर्व्हरमधून पोस्ट कार्यालयाचे कामकाज चालते. यासंदर्भात पोस्टल असिस्टंट वैभव कुंबळे यांनी पालघर तसेच मिरारोड येथील मुख्य कार्यालयातील वरिष्ठांकडे तक्रारी केल्या असल्याचे सांगितले. तसेच सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यास नोएडा येथूनच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व्हरमध्ये आलेला बिघाड दुरुस्त केला जातो. तरी लवकरच सर्व्हर दुरुस्त करून पोष्टाचे सर्व व्यवहार सुरळीत होतील अशी माहिती दिली.

- Advertisement -

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या माध्यमातून एफडी करण्यासाठी गेलो होतो. मात्र सर्व्हर बंद असल्याचे सांगण्यात आले. सातत्याने काहीना काही अडचणी निर्माण होऊन पोष्टाचे व्यवहार सतत ठप्प होत असल्याने पोष्टाकडे तक्रार दिली आहे.
— जितेंद्र मेहता, सफाळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -