घरमुंबईउद्योगांचे पॉवर आऊटेज होणार बंद

उद्योगांचे पॉवर आऊटेज होणार बंद

Subscribe

विजेसाठीची साप्ताहिक सुटी रद्द

राज्यातील महावितरणच्या औद्योगिक वीज ग्राहकांना यापुढे प्रत्येक आठवड्याचे पॉवर आऊटेज बंद होणार आहे. देखभाल दुरूस्तीच्या कामानिमित्ताने महिन्यातून एकदाच हे पॉवर आऊटेज घेण्याचा विचार महावितरणमार्फत होत आहे. विजेच्या उपलब्धतेत झालेली सुधारणा हे एक मुख्य कारण उद्योगाला द्यावी लागणारी सक्तीची रजा बंद करण्यासाठी आहे. तसेच गुणवत्तापूर्ण अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण पायाभूत यंत्रणेसाठी आर्थिक गुंतवणूक करणार आहे.

राज्यातील औद्योगिक ग्राहकांसाठीची सुटी ही सुरूवातीपासूनच उद्योग विभागाने निश्चित केली होती. राज्यात २०१४ मध्ये विजेच्या तुटवड्यामुळे संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या दिवशी हा सुटीचा दिवस भार व्यवस्थापनासाठी निश्चित करण्यात आला. औद्योगिक वीज ग्राहकांची विजेची सर्वाधिक मागणी पाहता भार व्यवस्थापनासाठी या सुट्या निश्चित करण्यात आल्या. पण राज्यात आता विजेची पुरेशी उपलब्धतता आहे. राज्यात सध्या मागणीपेक्षा अतिरिक्त वीज उपलब्ध असल्यानेच आता उद्योगांची आठवडा सुटी बंद करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. आतापर्यंत सुटीच्या दिवशी त्या फीडरवर काम हाती घेण्यात यायचे.

- Advertisement -

पण यापुढे महिनाभर आधीच औद्योगिक ग्राहकांना महिन्यातून एकदा घेण्यात येणार्‍या विजेच्या व्यवस्थापनाचे वेळापत्रक कळविण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योगांनाही आपल्या कामाचे नियोजन करता येणे शक्य होईल. महावितरणने राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांसोबत नुकताच एक संवाद साधला. त्यानिमित्ताने औद्योगिक वीज ग्राहकांनीही विजेच्या अखंडित वीज पुरवठ्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या उद्योगांसाठी विजेचा पुरवठा तर होतो आहे. पण त्यामध्ये गुणवत्ता नाही. अवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याचा परिणाम हा उत्पादनावर होतो. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात मिळणारी विजेची गुणवत्तापूर्ण सेवा ही राज्यातील इतर शहरात मिळणे ही अपेक्षा आहे, असे मत ठाणे बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनचे प्रतिनिधी अशोक पेंडसे यांनी दिली. अगदी ठाणे, नवी मुंबई शहरातही अखंडीत वीज पुरवठा सेवा मिळत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जुनी यंत्रणा दुरूस्ती, बदली करा. तसेच डेडिकेटेड मनुष्यबळाचा पुरवठा करा. एमआयडीसीसारखाच २४ तास ब्रेक डाऊन व्हॅनदेखील आम्हाला देण्यात यावा अशी मागणी औद्योगिक ग्राहकांनी केली आहे.

महावितरणकडून देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी एकूण ११०० कोटी रूपयांची तरतुद या आर्थिक वर्षासाठी करण्यात आली आहे. त्यामध्ये सबस्टेशन मेन्टेनन्स, ट्रान्सफॉर्मर मेन्टेनन्स तसेच वीज वाहिन्यांचे मेन्टेनन्स यासाठी वेगवेगळा निधी देण्यात आला आहे. महावितरण कर्ज घेऊन ही कामे करणार आहे. प्रत्येक सबस्टेशनसाठी डेडिकेटेड टीमदेखील देण्यात आली आहे. तसेच तीन ते पाच कंत्राटदारांची टीमदेखील यानिमित्ताने नेमण्यात आली आहे. त्यामुळेच अखंडीत वीज पुरवठा देण्यासाठी ही टीम पूर्णपणे काम करणार आहे. या सगळ्या कामासाठी महावितरणने राज्यात एकाच वेळी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच स्थानिक कंत्राटदारांनाही यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे असे महावितरणच्या अधिकार्‍याने सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -