घरमुंबईपायांवर ६ शस्त्रक्रिया तरी धावणार मुंबई मॅरेथॉन!

पायांवर ६ शस्त्रक्रिया तरी धावणार मुंबई मॅरेथॉन!

Subscribe

सँडहर्स्ट रोड स्थानकावर काही महिन्यांपूर्वी झालेल्या रेल्वे अपघातामध्ये द्रविता सिंग या तरुणीने उजवा तळपाय आणि डाव्या हाताची बोटं गमावली होती. तीच द्रविता आता मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

रेल्वे अपघातात वाचल्यानंतर पायांवर तब्बल ६ वेळा शस्त्रक्रिया केलेली कल्याणची द्रविता सिंग येत्या मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. आणि ती फक्त सहभागी होणार नसून तब्बल ६.६ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणार आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या चॅलेंजसाठी द्रविता मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आहे. त्यासाठी आता ती दररोज किमान अर्धा तास प्रॅक्टिस करत आहे. त्यात ती आधी थोडं चालण्याचा आणि नंतर धावण्याचा सराव करते.

नेमकं काय घडलं होतं?

फेब्रुवारी २०१८ मध्ये सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर द्रविताचा अपघात झाला होता. या रेल्वे अपघातात द्रविताने उजवा तळपाय आणि डाव्या हाताचं बोट गमावलं होतं. उपचारांसाठी भाटिया रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं. पाय तुटल्यानं द्रविता स्वत:च्या पायावर उभी राहील की नाही याचीही खात्री नव्हती. पण, त्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने द्रविता नुसतीच पायावर उभी राहिली नाही तर चालायला सुद्धा लागली. आणि आता तिने २० जानेवारीला होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्याचा निश्चय केला आहे.

- Advertisement -

द्रविताला करायची आहे ड्रीम रन!

याविषयी द्रविताने सांगितलं की, “माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या चॅलेंजसाठी मी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा निर्णय घेतला आहे. मी रोज सकाळी किमान अर्धा तास सराव करते. जेवढं माझ्याने होतं तेवढं चालते, थोडं धावते. कारण मी जास्त नाही धावू शकत. त्यामुळे थोडी थोडी प्रक्टिस करते. ड्रीम रनमधील ६.६ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत मी भाग घेतला आहे.”


हेही वाचा – वर्षाअखेर दिवशी २६ रेल्वे अपघात

अडीच महिन्यांतच उभी राहिली द्रविता

भाटिया रुग्णालयातल्या प्लास्टिक सर्जन डॉ. शैलेश रानडे यांनी द्रवितावर शस्त्रक्रिया केली होती. तब्बल ६ शस्त्रक्रिया तिच्यावर करण्यात आल्या होत्या. त्यात स्किन ग्राफ्टिंग शस्त्रक्रियेचाही समावेश होता. डॉक्टारांचे अथक प्रयत्न आणि द्रविताचा आत्मविश्वास यामुळे अडीच महिन्यातच ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. द्रविता जानेवारीत होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये धावेल, असा विश्वास डॉक्टरांनी तेव्हाच व्यक्त केला होता. डॉक्टरांचा हाच विश्वास द्रविता आता खरा करून दाखवण्यासाठी मॅरेथॉनमध्ये उतरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -