घरमुंबईसिनेट ऑफलाईन घेण्यासाठी सिनेट सदस्य आक्रमक

सिनेट ऑफलाईन घेण्यासाठी सिनेट सदस्य आक्रमक

Subscribe

एकीकडे महाविद्यालये सुरू करायची तर दुसरीकडे कोरोनाचे कारण देत विद्यापीठाकडून अधिसभा ऑनलाईन घेण्यात येत आहे, असा मुद्दा उपस्थित करत अधिसभा सदस्यांनी अधिसभेची वार्षिक सभा प्रत्यक्ष घेण्याची मागणी केली आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने मुंबई विद्यापीठाने महाविद्यालये सुरू केली तसेच उन्हाळी सत्रातील काही परीक्षा वगळता सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र १५ मार्च रोजी होणारी अधिसभेची वार्षिक सभा (सिनेट) कोरोनाचे कारण देत ऑनलाईन घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आला आहे. एकीकडे महाविद्यालये सुरू करायची तर दुसरीकडे कोरोनाचे कारण देत विद्यापीठाकडून अधिसभा ऑनलाईन घेण्यात येत आहे, असा मुद्दा उपस्थित करत अधिसभा सदस्यांनी अधिसभेची वार्षिक सभा प्रत्यक्ष घेण्याची मागणी केली आहे.

मुंबई विद्यापीठाने अधिसभेची वार्षिक सभा (सिनेट) ही १५ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. तसेच कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने सर्व सिनेट सदस्यांना पत्रकाद्वारे कळवले आहे. मात्र अधिसभा सदस्य डॉ. सुप्रिया करंडे, अ‍ॅड. वैभव थोरात, डॉ. धनराज कोहचाडे, मिलिंद साटम यांनी आक्षेप घेतला आहे. राज्यातील सर्वच निर्बंध सध्या खुले करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याचे अधिवेशन हे प्रत्यक्ष पद्धतीने होत आहे. मुंबई विद्यापीठाचे कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह हे मोठे असून, तेथे कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रत्यक्ष अधिसभा घेणे शक्य आहे. त्यामुळे अधिसभा ऑनलाईन घेण्याऐवजी प्रत्यक्ष घेण्यात यावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली. अधिसभा ऑफलाईन पद्धतीने घेतल्यास जास्तीत जास्त विषय प्रभावीपणे मांडणे शक्य होईल, असे पत्र अधिसभा सदस्य डॉ. सुप्रिया करंडे, अ‍ॅड. वैभव थोरात, डॉ. धनराज कोहचाडे, मिलिंद साटम यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांना दिले आहे. सध्या सुरू असलेले विधिमंडळ अधिवेशन प्रत्यक्ष होऊ शकते तर अधिसभा का ऑनलाईन घेण्यात येत आहे, असा प्रश्नही सिनेट सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -