घरमुंबईमहाविकास आघाडीची मानखुर्द पोटनिवडणुकीत बिघाडी

महाविकास आघाडीची मानखुर्द पोटनिवडणुकीत बिघाडी

Subscribe

महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात या पोटनिवडणुकीत या महाविकास आघाडीची बिघाडी झाल्याचे दिसून येते.

काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांनी मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक १४१मधील नगरसेवकपदाचा त्याग करत महापालिका सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या मतदार संघात येत्या ९ जानेवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्यावतीने माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि सपाची महाविकास आघाडी झाली असली तरी या मतदार संघात शिवसेना उमेदवाराविरोधात काँग्रेस आणि सपाचे उमेदवार उभे ठाकले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात या पोटनिवडणुकीत या महाविकास आघाडीची बिघाडी झाल्याचे दिसून येते.

विठ्ठल लोकरे हे मानखुर्द येथील प्रभाग क्रमांक १४१मधून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले होते. यापूर्वी सलग दोन वेळा विठ्ठल लोकरे आणि त्यांची पत्नी सुनंदा लोकरे या काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, या महापालिकेत ते निवडून आल्यानंतर प्रारंभी सुधार समिती सदस्य तर त्यानंतर स्थायी समिती सदस्य होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभीच विठ्ठल लोकरे यांनी पत्नीसह काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर व महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे महापालिका सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

- Advertisement -

२६ उमेदवारांचे अर्ज दाखल

त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघातून विठ्ठल लोकरे यांना शिवसेनेच्यावतीने उमेदवारी देण्यात आली होती. परंतु समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे लोकरे यांना पुन्हा पोटनिवडणुकीत त्यांच्याच प्रभागातून शिवसेनेने संधी दिली आहे. लोकरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाल्याने होणार्‍या येत्या ९ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. तर दुसर्‍याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिवसेनेसह समाजवादी पक्षासह काँग्रेस आणि भाजपचेही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
त्यामुळे या मतदार संघात विठ्ठल लोकरे यांच्यासह माजी नगरसेवक दिनेश पांचाळ, सपाचे जमीर खान, काँग्रेसचे वसंत कुंभार, उमेशकुमार जैन, मोहम्मद कुरेशी, पद्माकर पाटील, अल्ताफ काझी, सरुबाई साठे,रिपाइंचे अमोल क्षिरसागर, भारिपचे संबोधी कांबळे आदींसह २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी

विशेष म्हणजे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल, अशी जोरदार चर्चा होती. परंतु पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेले असल्याने आघाडीतच या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून बिघाडी झाल्याचे स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

कोण घेणार निवडणुकीतून माघार?

एकाच प्रभागात काँग्रेसचे सहा उमेदवार
विशेष म्हणजे काँग्रेसने या मतदार संघात सहा डमी उमेदवार दिले आहेत. मात्र, यापैकी अधिकृत उमेदवार कोण याबाबत अजुनही स्पष्टता आलेली नसून येत्या गुरुवारी २६ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे गुरुवारी यांपैकी किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतात आणि किती माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोणता हेही गुरुवारी स्पष्ट होईल.

पोटनिवडणुकीतील उमेदवारांची नावे

खान जमीर भोले-समाजवादी पक्ष
विठ्ठल लोकरे-शिवसेना
वसंत कुंभार-काँग्रेस
जैन उमेशकुमार-काँग्रेस
मोहम्मद कुरेशी-काँग्रेस
पद्माकर पाटील-काँग्रेस
अल्ताफ काझी-काँग्रेस
सरुबाई साठे-काँग्रेस
अमोर क्षिरसागर-रिपाइं
संबोधी कांबळे-भारिप
दिनेश पांचाळ-भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -