घरमुंबईमलबारचा टक्का वाढला, कुलाब्यात मतदारांची दांडी

मलबारचा टक्का वाढला, कुलाब्यात मतदारांची दांडी

Subscribe

दक्षिण मुंबईतील मतदार मतदानासाठी घराबाहेर का पडत नाहीत, असा सवाल नेहमी केला जातो. पण यंदा मलबार हिल येथील मतदानाच्या टक्केवारीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघात मलबार हिलच्या मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे. कारण निवडणूक आयोगाने दारोदारी पोहचून केलेले सर्वेक्षण पथ्यावर पडले आहे. दक्षिण मुंबईत झालेल्या सर्वेक्षणात तब्बल दहा हजार मृत मतदारांची नावे एकट्या मलबार हिल मतदारसंघातून वगळण्यात आली आहेत. मृत्यूमुखी पडलेले, स्थलांतरीत झालेले आणि मतदानासाठी गैरहजर राहणार्‍या मतदारांची अपडेटेड यादी दक्षिण मध्य मतदारसंघासाठी तयार करण्यात आली. त्याचा फायदा हा मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी झालेला आहे. दक्षिण मुंबईतील मलबार मतदारसंघात 56.08 इतक विक्रमी मतदान झाले. या मतदारसंघात एकूण २ लाख ६० हजार ६५७ मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ४६ हजार २०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरूष मतदारांचा टक्का हा ५६.७८ टक्के तर महिला मतदारांचा आकडा ५५.३२ टक्के इतका होता.

निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी या मतदारसंघात राबवलेल्या मोहिमेचा फायदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी झाला अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांंनी दिली. संपूर्ण मतदारसंघात साधारणपणे २५ हजार ते ३० हजार इतक्या मतदारांचे नाव वगळण्यात आले. त्यामध्ये मतदारसंघ सोडून गेलेल मतदार, वारंवार गैरहजर राहणारे मतदार आणि मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. तुलनेत मुंबादेवी आणि कुलाबा या मतदारसंघात मात्र मतदानाची आकडेवारी घटली असल्याचे दिसते. कुलाबा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असणार्‍या झोपडपट्टी भाग, तसेच रेल्वे वसाहतीचा समावेश आहे. अनेक मतदार तसेच सरकारी कर्मचारी हे स्थलांतरीत झाल्यानेच ही आकडेवारी कमी झाल्याचे ते म्हणाले. सनदी अधिकारी दक्षिण मुंबई सोडून गेल्यावरही दहा वर्षाहून अधिक नावे मतदार यादीत आढळल्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिली. झोपडीपट्टीभागामध्ये मतदारांचा नेमका पत्ता शोधून काढणे आणि यादी अपडेट करणे यामध्ये मोठे अडथळे असल्याचेही त्यांनी कबुल केले. अनेक ठिकाणी झोपडपट्टीला नाव असते, पण झोपड्यांना क्रमांक नसल्याने मतदार शोधणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान होते, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

विधानसभानिहाय मतदान (टक्के)
वरळी – 51.98
शिवडी – 52.62
भायखळा – 54.56
मलबार हिल – 56.08
मुंबादेवी – 48.33
कुलाबा – 45.16

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -