घरमुंबईजे.जे. मध्ये थ्रोम्बोसिसच्या उपचारांसाठी स्वतंत्र हेमॅटोलॉजी सेंटर

जे.जे. मध्ये थ्रोम्बोसिसच्या उपचारांसाठी स्वतंत्र हेमॅटोलॉजी सेंटर

Subscribe

थ्रोम्बोसिस आणि हेमोफिलिया यांसारख्या रक्तासंदर्भातील आजारांचं निदान वेळेवर होऊन त्यावर उपचार करण्यासाठी मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये हेमॅटोलॉजी सेंटर सुरू करण्यात आलं आहे. हे मुंबईतील पहिलंच स्वतंत्र हेमॅटोलॉजी सेंटर असल्याचा दावा डॉक्टरांकडून करण्यात आला आहे.

एखाद्या आजाराचं वेळेवर योग्य निदान झालं तर त्यावर उपचार करुन प्रतिबंध घालता येतो. मात्र हल्ली सायलेंट किलर हे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. थ्रोम्बोसिस आणि हेमोफिलिया यांसारख्या रक्तासंदर्भातील आजारांचं निदान अनेकदा उशिरा होतं. त्यामुळे आजारांबाबत जनजागृती निर्माण होऊन वेळेवर उपचार मिळावे, यासाठी मुंबईतील सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये हेमॅटोलॉजी सेंटर सुरू करण्यात आलं आहे. हे मुंबईतील पहिलंच स्वतंत्र हेमॅटोलॉजी सेंटर असल्याचा दावा डॉक्टरांकडून करण्यात आला आहे. मुंबईनंतर पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज आणि नागपूरमधील दि गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्येही लवकरच हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

या आजाराबाबत रुग्णांमध्ये जागृती निर्माण होणार

सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या हेमॅटोलॉजी सेंटरमध्ये थ्रोम्बोसिस रुग्णांवर तात्काळ निदान, उपचार आणि प्रतिबंध करण्यावर जास्त भर देण्यात येणार आहे. गेल्या दशकभरात या हॉस्पिटलमध्ये थ्रोम्बोसिसवर उपचार घेतलेल्या रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. भारतातील २० ते ३० टक्क्यांहून अधिक थ्रोम्बोसिस रुग्णांचे निदानच होत नाही किंवा त्यांच्यावर उपचार होत नाहीत, असा अंदाज आहे. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून थ्रोम्बोसिस आणि त्याचे परिणाम याबद्दल रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी मदत होणार आहे.

- Advertisement -

जगभरात चारपैकी एकाचा मृत्यू

याविषयी २० वर्षांहूनही अधिक काळ यूकेमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या कन्सलटंट हेमॅटोलॉजिस्ट डॉ. सविता रंगराजन यांनी सांगितलं की, “जगभरात चारपैकी एका व्यक्तीचा मृत्यू रक्तात गुठळ्या झाल्याने होतो. पण अनेकांना हे माहीत नाही की, शस्त्रक्रिया हे थ्रोम्बोसिस होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे. तर ६० टक्के व्हीटीई (वेनोअस थ्रोम्बोएम्बोलिझम) प्रकरणं हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर किंवा त्यानंतर उद्भवतात. त्यामुळे जगभरात हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या मृत्यूमागील टाळता येणाऱ्या कारणांमधील हे एक कारण आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये बचावात्मक व्हीईटीचा धोका कमी करण्यासाठी आणि त्याच्या परिणामकारक उपचारांसाठी नियमावली आहे. भारतातही या प्रकारचे प्रमाणीकरण आवश्यक आहे. हॉस्पिटलमधील सुरक्षा आणि दर्जा प्रक्रिया, सातत्याने दिले जाणारे वैद्यकीय शिक्षण या माध्यमातून आपण या जीवघेण्या स्थितीचा धोका कमी करू शकतो.”

आजाराचं निदान करणं आवश्यक

सर जे. जे. ग्रुप हॉस्पिटलच्या आणि दि ग्रँड मेडिकल कॉलेजच्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन असोसिएट प्रोफेसर डॉ. प्रिया पाटील म्हणाल्या, “थ्रोम्बोसिसचं वेळेत निदान, उपचार आणि त्याला प्रतिबंध हे या सेंटरचं उद्दिष्ट आहे. भारतात थ्रोम्बोसिसच्या रुग्णांची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे थ्रोम्बोसिस उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची आम्ही माहिती जमा करणार आहोत. या माहितीतून आम्हाला भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या थ्रोम्बोसीसचा प्रकार शोधण्यात मदत होईल. त्यातून तात्काळ निदान, उपचार आणि प्रतिबंध घालणं सोपं होईल. आजाराचं मूळ कारण आणि धोक्याची लक्षणं समजू शकतील. ज्यामुळे या आजाराची संभाव्यता मांडता येईल आणि त्यातून आजार होणंही टाळता येईल.”

- Advertisement -

आजाराचा तपास होणं जास्त महत्त्वाचं

थ्रोम्बोसिस या आजाराचा परिणाम प्रत्येक व्यक्तींवर अवलंबून असतो. शिवाय या आजाराचा सर्वात जास्त त्रास हाय रिस्क रुग्णांना होतो. याविषयी अधिक माहिती देताना शीव हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद गोरेगांवकर यांनी सांगितलं की, “या आजाराबाबत आजही तेवढ्या प्रमाणात जनजागृती नाही. त्यामुळे हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या आजारात तपास होणं जास्त गरजेचं आहे. जर तात्पुरत्या गोळ्या घेऊन ट्रिटमेंट थांबवली तर पुन्हा हा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांचा फॉलो अप असणं गरजेचं असतं.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -