घरमुंबईअखेर २२ वर्षांनंतर ठाण्यात उभा राहणार राजीव गांधींचा पुतळा

अखेर २२ वर्षांनंतर ठाण्यात उभा राहणार राजीव गांधींचा पुतळा

Subscribe

मंत्री अस्लम शेख यांची यशस्वी मध्यस्थी

राज्यातील महाविकास आघाडीमुळे ठाण्यात काँग्रेसची सरशी झाली आहे. त्यानुसार स्व.राजीव गांधींचा पुतळा ठाणे महापालिका उभारणार असून त्यासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या येत्या १५ दिवसात दिल्या जातील, असे आश्वासन राज्याचे मत्स्यविकास मंत्री अस्लम शेख यांनी दिले. मागील २२ वर्षांपासून ठाण्यामध्ये आधुनिक भारताचे शिल्पकार आणि माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांचा पुतळा उभारावा ही मागणी ठाणे शहर काँग्रेसने लावून धरली होती. या मागणीसाठी गुरुवारी ठाणे महापालिकेसमोर काँग्रेसकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यावेळी शेख यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन हे आश्वासन दिले.ठाणे बाजारपेठेतील जिल्हा परिषदेच्या आवारात देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुतळा उभारण्यात आला होता.

तत्कालीन मनपा आयुक्त टी.चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात रस्ता रुंदीकरणात बाधित झाल्याने हा पुतळा हटवण्यात आला होता. तेव्हापासून ठाण्यात राजीव गांधींचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी होत होती. यासंदर्भातील प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. या पुतळ्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र गेली २२ वर्ष हा प्रस्ताव कागदावरच राहिला. या प्रस्तावाची त्वरीत अंमलबजावणी करा, या मागणीसाठी ठाणे शहर काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आल्याने मंत्री अस्लम शेख यांनी गुरुवारी आंदोलन ठिकाणी भेट दिली. या भेटीवेळी ठाणे महापालिकेचे महापौर व सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि संपूर्ण पालिका प्रशासन आंदोलनस्थळी दाखल होऊन पुतळ्याला तात्काळ मंजुरी देण्यात आली. शेख यांनी याबाबतच्या सर्व परवानग्या येत्या १५ दिवसात देण्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -