घरमुंबईमुख्यालयासमोरच महापालिका कारभाराची मनसेकडून पोलखोल

मुख्यालयासमोरच महापालिका कारभाराची मनसेकडून पोलखोल

Subscribe

वॉर्ड ऑफिसर चौर हैच्या नार्‍यानंतरही महापालिकेचे अधिकारी थंडच

फेरीवाल्यांच्या मुद्यावर आक्रमक असलेल्या मनसेने आता महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांना (वॉड ऑफिसर) टार्गेट केले आहे. फेरीवाल्यांवर कारवाई न करता त्यांना अभय देणार्‍या सहायक आयुक्तांचा निषेध करण्यासाठी मनसेने वॉर्ड ऑफीसर चोर है अशी समाजमाध्यमावर मोहिम राबवून नागरिकांकडून अतिक्रमित फेरीवाल्यांची छायाचित्रे मागवली होती. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून मुंबईसह ठाण्यातील सर्व फेरीवाल्यांच्या या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवत त्यांनी महापालिकेच्या कारवाईचा पोलखोल केला आहे.

एलफिन्स्टनच्या पुलावरील चेंगराचेंगरीनंतर फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी आक्रमक झालेल्या मनसेकडून पुन्हा एकदा फेरीवाल्यांना टार्गेट केले जात आहे. प्रभादेवीतील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याने याचा जाब विचारण्यास गेलेल्या मनसेचे विभागप्रमुख संतोष धुरी यांच्यासह पदाधिकार्‍यांशी जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांनी उर्मट वर्तन केले. यावेळी जैन आणि मनसेच्या पदाधिकार्‍यांमध्ये हमरीतुमरी झाली. याप्रकरणी धुरी यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. याचा निषेध म्हणून मनसेने वॉर्ड ऑफीसर चौर है अशी मोहिम समाजमाध्यमावर राबवून नागरिकांना आपापल्या भागातील अतिक्रमित फेरीवाल्यांची छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन केले होते.

- Advertisement -

फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राफ आणि व्हाट्सअप आदी समाजमाध्यमावर राबवलेल्या या मोहिमेमध्ये मुंबईसह ठाणे परिसरातील २२४३ अतिक्रमित फेरीवाल्यांची छायाचित्रे नागरिकांनी पाठवली होती. यातील काही निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रांगणात भरवण्यात आले होते. रेल्वे हद्दीत १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी आहे. तरीही फेरीवाले बस्तान बसवून आहेत. त्यांच्यावर महापालिकेचे सहायक आयुक्त कारवाई करत नाही. मनसेच्या पदाधिकार्‍यांनी ही बाब निदर्शनास आणूनही त्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून हे प्रदर्शन असल्याचे आयोजक असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि विभागप्रमुख संतोष धुरी यांनी स्पष्ट केले.

गेली २५ ते २८ वर्षे शिवसेना भाजपाची महापालिकेत सत्ता आहे. हे प्रदर्शन त्यांच्या निष्क्रिय व भ्रष्ट कारभाराचा नमुना आहे. आमच्यावर कितीही केसेस झाल्या तरी आम्ही सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसांसाठी आंदोलन करतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

महापालिकेच्या नाकावर टिच्चून
महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर चोर आहेत, असे घोषवाक्य देत मनसेने अतिक्रमित फेरीवाल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन महापालिका मुख्यालयासमोरच भरवले होते. यासाठीचे दर्शनी फलकच पदपथावर लावण्यात आले होते. परंतु अनधिकृतपणे लावलेल्या या फलकांवरही महापालिकेने कोणतीही कारवाई न करता मनसेच्या या मोहिमेचे एकप्रकारे स्वागत केले. महापालिकेने यावर कोणतीही कारवाई न केल्याने महापालिकेला आपले सहायक आयुक्त चोर आहेत हे मान्य करावे लागले आहे. दरम्यान ए विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता,संध्याकाळी याप्रदर्शनासाठी पदपथावर लावण्यात आलेल्या फलकांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु त्यांनी पुन्हा तिथे फलक लावल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -