घरमुंबईकुणी निकाल देता का निकाल?

कुणी निकाल देता का निकाल?

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाचा फटका गेल्यावर्षी हजारो विद्यार्थ्यांना बसला. या निकाल गोंधळातून अद्याप विद्यार्थ्यांची सुटका झालेली नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्यावर्षी मार्च २०१७ मध्ये त्याने परीक्षा दिली,जाहीर झालेल्या निकालात तो नापास झाला. मात्र इतर विषयांचे गुण लक्षात घेता, नापास झालेल्या दोन विषायांच्या पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. आज अर्ज करुन वर्ष उलटले तरी अद्याप या विद्यार्थ्याचा पूनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. निकालासाठी तो वर्षभर विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनात वणवण फिरत आहे. मात्र त्यानंतरही त्याच्या हाती निकालाची आणि उत्तरपत्रिकेची प्रत मिळालेली नाही. ही कहाणी आहे मुंबई विद्यापीठात टीवाय बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केलेल्या सुखदेव शर्मा याची. वर्ष उलटले तरी सुखदेव निकालापासून वंचित आहे. निकालाअभावी त्याचे एक वर्ष वाया गेले आहे. आगामी वर्षाबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

वर्षभरापासून विद्यार्थ्यांची वणवण

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाचा फटका गेल्यावर्षी हजारो विद्यार्थ्यांना बसला. या निकाल गोंधळातून अद्याप विद्यार्थ्यांची सुटका झालेली नसून त्याचाच फटका सुखदेव शर्माला बसला आहे. सुखदेव शर्मा हा भवन्स कॉलेजमधील विद्यार्थी असून त्याने मार्च २०१७ रोजी टीवाय बीएस्सीची परीक्षा दिली. विद्यापीठाने टीवाय बीएस्सी निकाल ३१ जुलै रोजी जाहीर केला होता. मात्र या निकालात तो दोन विषयात नापास झाला. अ‍ॅनेलिटीकल केमिस्ट्री आणि ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांमध्ये सुखदेव नापास झाला होता. या दोन्ही विषयांसाठी त्याने विद्यापीठात पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. पूनर्मूल्यांकनात अर्ज करताना त्याने फोटोकॉपीसाठी अर्ज केले होते. मात्र त्याला अद्याप फोटोकॉपी देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षभरात त्याने अनेकवेळा परीक्षा विभागात निकालासाठी धाव घेतली होती, मात्र फक्त आश्वासनाखेरीज त्याच्या हाती काहीही लागलेले नाही. दोन दिवसांत निकाल जाहीर होईल, असे त्याला अधिकार्‍यांकडून वारंवार सांगण्यात आले. मात्र त्यानंतरही निकाल जाहीर केला जात नसल्याने परीक्षा भवनातील त्याच्या फेर्‍या संपलेल्या नाहीत.

- Advertisement -

अजून किती शिक्षा देणार?

निकाल जाहीर झाल्यानंतर मी लगेचच पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. मात्र आजतागायत मला माझा निकाल मिळालेला नाही. निकाल नसल्याने मला कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेता आलेला नाही. त्यामुळे माझे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. आताही वेळेत निकाल जाहीर झाला नाही तर माझ्यासमोर नवी अडचण निर्माण होणार आहे. विद्यापीठ मला अजून किती शिक्षा देणार आहे हेच कळायला मार्ग नाही.
सुखदेव शर्मा, निकालाच्या प्रतीक्षेत असलेला विद्यार्थी.

कारवाई न झाल्याने ही वेळ

गेल्यावर्षी मुंबई विद्यापीठात झालेल्या निकाल गोंधळामुळेच ही वेळ आली आहे. एक वर्ष झाले तरी निकालासाठी वाट पहावी लागते. ही बाब अत्यंत गंभीर आहे. आम्ही या अगोदरदेखील सिनेटच्या बैठकीत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यानंतर पूनर्मूल्यांकनाच्या निकालासंदर्भात विद्यापीठाने कोणतीही ठोस पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे ही वेळ आली आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा नव्या कुलगुरुंची भेट घेऊन आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करणार आहोत.
– प्रदीप सावंत, मुंबई विद्यापीठ, सिनेट आणि मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य.

- Advertisement -

उत्तरपत्रिका हरविल्याने निकाल लांबला

दरम्यान, या विद्यार्थ्याचा निकाल लांबल्या संदर्भात ‘आपलं महानगर’ने शोध घेतला. त्यावेळी या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्याचा निकाल जाहीर झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. ही उत्तरपत्रिका हरवल्याचा दावा काही अधिकार्‍यांकडून नाव न छापण्याच्या अटीवर करण्यात आला आहे. सदर विद्यार्थ्याच्या त्या पेपरचे मूल्यांकन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.

– विनोद मळाळे, उपकुलसचिव, जनसंपर्क विभाग.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -