घरमुंबईशाळेसाठी माजी विद्यार्थी वाजवणार ढोल-ताशे!

शाळेसाठी माजी विद्यार्थी वाजवणार ढोल-ताशे!

Subscribe

मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे आगळे-वेगळे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आघाडीवर असलेल्या सायनच्या शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी आता शाळेतील विविध उपक्रमांसाठीच्या निधी उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेच्या ‘धश्रीयन’ या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेने ‘धश्रीयन ध्वजपथक-ढोलपथका’ची स्थापना केली आहे. रविवारी डी.एस. हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी या ध्वजपथकाद्वारे शाळेला अनोखी मानवंदना दिली.

हल्ली लग्न समारंभापासून गणपती-दुर्गादेवीच्या मिरवणुकांपर्यंत अशा अनेक ठिकाणी ध्वजपथक-ढोलपथकांना मागणी असते. ढोल-ताशे-झांज-लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजराने एक वेगळीच वातावरणनिर्मिती केली जाते. त्यामुळेच अशा ढोलपथक-ध्वजपथकांना चांगले मानधनही मिळते. डी.एस. शाळेचे माजी विद्यार्थी मिलिंद विचारे, विशाल दवंडे आणि वैशाली गीते यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मिलिंद विचारे यांच्या वंदन ढोल ताशा आणि ध्वजपथकात सुमारे २५० वादक आहेत. याविषयी अधिक माहिती देताना मिलिंद विचारे म्हणाले, शाळेच्या धश्रीयन ढोलपथकात पहिल्या टप्प्यात एकूण ६०वादक असणार असून त्यांपैकी ४० माजी विद्यार्थी असणार आहेत, तर शाळेतील इयत्ता नववीचे २० विद्यार्थी ध्वज फडकविणार आहेत.

- Advertisement -

डी.एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान म्हणाले, शाळेचे अनेक माजी विद्यार्थी विविध उपक्रमांद्वारे शाळेसाठी निधी संकलन करत आहेत. या नवनव्या उपक्रमांच्या कल्पना त्यांच्याच आहेत. शाळेचे विश्वस्त म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. ढोल ताशा ध्वजपथकाच्या एका ऑर्डरमधून शाळेला सुमारे २५ हजार रुपये मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -