घरमुंबईठाणे झाले खड्ड्यांचे स्मार्टसिटी?

ठाणे झाले खड्ड्यांचे स्मार्टसिटी?

Subscribe

ठाण्यात कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेले रस्ते वर्षभरात चाळण झाले. प्रत्येकवर्षी रस्त्यांच्या डागडुजीसाठी कोट्यवधींचा खर्च करून जनतेच्या पैशांचा अपव्यव करण्यात येतो. याचाच निषेध नोंदवित ठाणे फर्स्ट संघटना गुरुवारी खड्ड्यांचे श्राद्ध घालणार असल्याची माहिती संजय घाडीगावकर यांनी दिली. कोट्यवधींच्या खर्चानंतर रस्त्यावर खड्डे पडतात कसे? असा सवालही उपस्थित केला.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ठाण्यातील जनता खड्डेमुक्त रस्त्यांची मागणी करत आहे. भर पावसात खड्डे बुजविण्यासाठी टेंडर काढली जातात, मातीने खड्डे भरण्याचा प्रयत्न होतो, काही ठिकाणी डांबर टाकले जाते. मात्र, मुसळधार पाऊस असल्याने पुन्हा तेथे खड्डे होतात, पावसात खड्डे भरण्यापेक्षा ते पावसाआधी का भरले जात नाहीत? असा सवाल संजय घाडीगांवकर यांनी केला आहे. भरपावसात खड्डे भरून कोट्यवधीचा खर्च करतात त्यानंतर भरलेले खड्डे पावसात वाहून गेल्यानंतर पावसाळ्यानंतर पुन्हा खड्डे भरण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करून ठाणेकरांच्या पैशाचा चुराडा करण्यात येत असल्याचा आरोप घाडीगावकर यांनी केला. एकीकडे ठाणे स्मार्टसिटी होणार म्हणून अवघ्या ठाण्यात जाहिरातबाजी सुरू आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. प्रशासनाच्या या कृतीचा निषेध नोंदविण्यासाठी ठाणे फर्स्ट फाऊंडेशन’च्या वतीने गुरुवारी खड्ड्यांचे विधिवत श्राद्ध घातले जाणार आहे.

- Advertisement -

सत्ताधारी आणि प्रशासन नागरिकांना खड्ड्यांपासून मुक्तता देत नसल्याने खड्ड्यांचे श्राद्ध घालून किमान खड्ड्यांनी आता स्वतःहून मुक्ती घ्यावी, अशा आशयाचे उपहासात्मक आंदोलन संजय घाडीगांवकर यांच्यामार्फत केले जाणार आहे. ठाण्यातील सुजाण नागरिकांनी या आंदोलनाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून जनजागृती करावी, असे आवाहनही घाडीगांवकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -