घरमुंबईपॉलिसीच्या नावाने वयोवृद्ध महिलेची फसवणूक करणार्‍यांना अटक

पॉलिसीच्या नावाने वयोवृद्ध महिलेची फसवणूक करणार्‍यांना अटक

Subscribe

पॉलिसीच्या नावाने वयोवृद्ध महिलेची फसवणुक करणार्‍या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पॉलिसीच्या नावाने एका ६७ वर्षांच्या सेवानिवृत्त वयोवृद्ध महिलेला सुमारे ६७ लाख रुपयांना गंडा घालणार्‍या सात जणांना मंगळवारी समतानगर पोलिसांनी अटक केली. रोहित राजेंद्र पारटे, प्रशांत विठ्ठल कोटीयन, प्रविण सागर निंबाळकर, राहुल रविंद्र वैराळ, विक्रांत गजमल, परेश दरीपकर आणि सुमीत सावंत अशी या सात आरोपींची नावे असून ते सर्वजण भांडुपचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या सर्वांना बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार १३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

तक्रारदार वयोवृद्ध महिला ही कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्सच्या एका पॉश सोसायटीमध्ये राहत असून त्या सेवानिवृत्त आहेत. आठ वर्षांपूर्वी त्यांनी एका खाजगी कंपनीची एक कोटी रुपयांची पॉलिसी काढली होती. त्यासाठी त्या दरवर्षी कंपनीत तीस हजार रुपये जमा करीत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी पॉलिसीची प्रिमिअम रक्कम भरली नव्हती. त्यामुळे त्यांना एका अज्ञात ठगाने फोन करुन त्यांच्याकडे त्यांच्या पॉलिसीच्या प्रिमिअरची रक्कमेबाबत विचारणा केली. आपण या कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना पॉलिसीचे नूतनीकरण करण्यास सांगून त्यांना कंपनीकडून चांगला बोनस मिळवून देतो असेही सांगितले. त्याच्या बतावणी भुलून त्यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यात सुमारे ६७ लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम जमा करुनही त्यांना पॉलिसीची रक्कम मिळाली नाही. अलीकडेच अशाच प्रकारे फसवणुक केल्याप्रकरणी एका ठगाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. चौकशीत त्याने कांदिवलीतील एका वयोवृद्ध महिलेची फसवणुक केल्याची कबुली दिली होती.

- Advertisement -

या जबानीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी संंबंधित महिलेची चौकशी केली होती, तिने तिची फसवणुक झाल्याची कबुली देताना या ठगाविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या आरोपींचा शोध सुरु असतानाच अशा प्रकारे फसवणुक करणार्‍या एका टोळीचा नवी मुंबई सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याच गुन्ह्यांत नंतर वेगवेगळ्या परिसरातून सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत त्यांनीच या वयोवृद्ध महिलेची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या सातही आरोपींचा नवी मुंबई पोलिसांकडून समतानगर पोलिसांनी ताबा घेतला होता. याच गुन्ह्यांत मंगळवारी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -