घरमुंबईरस्त्यातील खड्ड्यांमुळे समाजसेवकाचा बळी

रस्त्यातील खड्ड्यांमुळे समाजसेवकाचा बळी

Subscribe

आपल्या अ‍ॅक्टिव्हा स्कूटरने रस्त्याने जात असताना खड्ड्यात पडल्याने समाजसेवक भरत खरे यांना जीव गमवावा लागला. या घटनेस मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.उल्हासनगर- 4 येथे राहणारे भरत खरे हे बुधवारी सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून राधास्वामी सत्संग चौकाकडून फालवर लाईनच्या दिशेने येत असताना रस्त्यातील एका खड्ड्यात त्यांची गाडी आदळली. यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना बेशुद्ध अवस्थेत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना डोंबिवलीच्या एम्स आणि नंतर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले गेले. या रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत शुक्रवारी सकाळी 6 वाजता माळवली.

शुक्रवारच्या महासभेत भरत खरे यांच्या अपघाताचे तीव्र पडसाद उमटले. शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे आणि राजेंद्र चौधरी यांनी आरोप केला की, भरत खरे यांच्या मृत्यूला उल्हासनगर महानगरपालिका जबाबदार आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी केला जातो. मात्र, तरीदेखील खड्डे कायम असतात. खड्ड्यांमुळे महापालिका अखेर किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न भाजप नगरसेवक डॉ. प्रकाश नाथानी यांनी विचारला, तर पालिकेच्या निष्काळजीमुळेच भरत खरे यांचा जीव गेल्याचा आरोप नगरसेवक प्रमोद टाले यांनी केला व खरे यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली. या मागणीला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मनपा उपायुक्त विकास चव्हाण यांनी प्रशासनाने 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याचे सांगितले.

- Advertisement -

भरत खरे हे समाजसेवक, रुग्णमित्र पत्रकार म्हणून उल्हासनगरात परिचित होते. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल राज्य शासनाने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केले होते. अलीकडेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आज दुपारी 12 वाजता उल्हासनगर – 4 येथील स्मशानभूमीत भरत खरे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -