घरमुंबईगोरेगावमध्ये इमारतीत चोरी

गोरेगावमध्ये इमारतीत चोरी

Subscribe

बांबूच्या परांचीचा वापर

इमारतीच्या डागडुजीसाठी बांधण्यात येणार्‍या बांबूच्या परांचीवर चडून घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील दोन खोल्यामध्ये चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चोरीच्या घटनेमुळे इमारतीत राहणार्‍या रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

गोरेगाव पश्चिम शास्त्रीनगर या ठिकाणी असलेल्या ओम हाईट्स या इमारतीचे डागडुजी तसेच रंगरंगोटीचे काम मागील काही आठवड्यांपासून सुरु आहे. या कामासाठी कंत्राटदाराकडून इमारतीच्या अवतीभोवती बांबूची परांची बांधण्यात आली आहे. या इमारतीत १२ व्या मजल्यावर सपना भावसार राहतात. १४ जानेवारी रोजी रात्री त्या हॉलची खिडकी उघडी ठेवून झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या होत्या. दुसर्‍या दिवशी सकाळी त्या उठल्या असता हॉलमधील लॅपटॉप असलेली बॅग चोरीला गेली होती. त्या बॅगमध्ये लॅपटॉप आणि वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड होते. त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी दार व्यवस्थित बंद केले होते का याची खात्री केली असता दाराची कडी बंद होती, मात्र हॉलची खिडकी उघडी असल्यामुळे चोरट्याने परांचीवर चढून खिडकीवाटे येऊन चोरी केली असावी, असा संशय भावसार यांनी व्यक्त केला. १२ व्या मजल्यावर खोली असल्यामुळे आम्ही खिडकी उघडी ठेवली होती, मात्र चोरट्याने बांबूच्या परांचीवर चढून खिडकीतून घरात प्रवेश करून हॉलमध्ये ठेवलेला लॅपटॉप आणि बँकेचे कार्ड चोरले, अशी माहिती सपना भावसार यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान त्याच रात्री या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणार्‍या अनुभुती शेठ यांच्यादेखील घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले, अज्ञात चोरट्याने खिडकीतून येऊन अनुभूती सेठ यांच्या घरातील काही मौलवान वस्तू चोरल्या. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर या इमारतीत राहणार्‍या रहिवाशांना इमारतीचे काम सुरु आहे तोपर्यंत अन्यत्र राहण्यास जावे, असे आवाहन सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

मुंबईसह उपनगरात परांचीवर चढून चोरी करणारी टोळी कार्यरत आहे. ही टोळी मुंबईत डागडुजीचे काम सुरु असणार्‍या इमारतीची रेकी करून त्या ठिकाणी चोरी करते. या टोळीच्या मागावर आमच्या पोलीस ठाण्याचे एक पथक असून लवकरच चोरांना अटक करण्यात येईल.
– संजीव भोळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोरेगाव पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -