घरमुंबईजागा आहे पण घरे नाहीत

जागा आहे पण घरे नाहीत

Subscribe

मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांची व्यथा

ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीच्या अखत्यारित असलेल्या मुंब्रा अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना अधिकृत जागा असतानाही निवासस्थानाची सोय नाही. त्यामुळे येथील कर्मचार्‍यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वर्ष 2013 मध्ये दोन मजल्याची इमारत असलेले हे केंद्र धोकादायक ठरवण्यात आले. तरीही येथून दलाचे कामकाज चालत होते. त्यानंतर 2016 ला कार्यालयाचा काही भाग पडल्याने हे केंद्र रिकामे करण्यात आले. जवळच्या मंदिरात शेड बांधून अग्निशमन दलाचा कारभार सुरू करण्यात आला.

ठामपा प्रशासनाने अग्निशमन दलाची ही इमारत तातडीने पाडली. त्यासोबतच कर्मचारी निवासस्थानेही पाडण्यात आली. वर्षभरातच अग्निशमन दलाची इमारत उभी राहिली. मात्र, कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. आज एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही जागा उपलब्ध असतानादेखील कर्मचार्‍यांच्या निवासस्थानाचा प्रश्न सुटलेला नाही. याकडे ठाणे महानगरपालिका प्रशासन लक्ष देईल काय? असा प्रश्न येथील कर्मचारी करीत आहेत.

- Advertisement -

मुंब्रा परिसरात महिन्याला जवळपास लहान मोठ्या अशा सरासरी 25 ते 30 च्या आसपास आगीच्या घटना घडतात. त्याकरिता 1990 साली तळ अधिक दोन माळ्यांचे अग्निशमन दलाचे केंद्र बनवण्यात आले. तसेच 50 कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ असलेल्या कर्मचार्‍यांसाठी तीन विंगमध्ये असलेल्या इमारतीत कर्मचार्‍यांच्या कुटुंबांचीही व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मुंब्रा ते शिळफाटा परिसरात कुठेही आग लागण्याची घटना घडली असता तत्काळ मनुष्यबळ उपलब्ध होत असे. मात्र, हे निवासस्थान पाडल्यापासून मुंब्रा अग्निशमन दलाला मनुष्यबळाकरिता अन्य केंद्रांची मदत घ्यावी लागत आहे. मुंब्रा केंद्रातील जवळपास सर्वच कर्मचारी हे परिवारासह कल्याणच्या पुढे अंबरनाथ, टिटवाळा अशा विविध ठिकाणी कमी भाड्याच्या खोलीत राहत आहेत. त्यामुळे एखादी घटना घडली तर या अग्निशमन केंद्राची फार तारांबळ होत आहे.

वास्तविक पाहता अग्निशमन केंद्राच्या बाजूला परेड ग्राऊंड आणि कर्मचारी व अधिकारी यांची निवासस्थाने आवश्यक आहेत. नव्याने बनविण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राच्या मागे निवास्थानाची जागा रिकामीच आहे. सध्या या मोकळ्या जागेचा वापर ठामपाच्या मुंब्रा प्रभाग समितीद्वारे भंडारगृह, गोदाम म्हणून वापरण्यात येत आहे. बंद गाड्या, मुंब्रा प्रभाग समितीतून काढलेले जाहिरात फलक हे त्या मोकळ्या जागेवर आणून टाकण्यात येत आहेत. निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित असतानाच कर्मचार्‍यांना परेड करण्यासाठी मैदान किंवा जागा नसल्यानेही फार अडचण होत असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंब्रा अग्निशमन दलाचे केंद्र तयार झाले आहे. मात्र, या केंद्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची तोडलेली इमारत कधी तयार होईल, याबाबत संबंधित अभियंत्याशी चर्चा केल्यानंतरच सांगता येईल. दरम्यान, कर्मचार्‍यांसाठी केंद्राच्या वरच्या मजल्यात एक विश्रांतीगृह बनवून देण्यात आले आहे. यामध्ये लाईट आणि पिण्याचे पाणी यांची व्यवस्था लवकरच करण्यात येईल, त्यामुळे कर्मचार्‍यांच्या विश्रांतीचा प्रश्न निकाली निघेल.                                                                    -महेश आहेर, सहाय्यक आयुक्त ठामपा, प्रभारी मुंब्रा प्रभाग समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -