घरमुंबईविलेपार्ले दुर्घटनेत ‘ते’ तिघे ठरले देवदूत

विलेपार्ले दुर्घटनेत ‘ते’ तिघे ठरले देवदूत

Subscribe

12 ते 13 महिलांना वाचवले

मुंबई: जितीया उपवासानिमित्त विहिरीवर पूजा करताना अचानक कठडा तुटल्याने 30 ते 40 महिला विहिरीत पडल्या. यावेळी तेथूनच जात असलेेल्या तीन तरुणांनी विहिरीत उडी घेऊन महिलांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. तरुणांनी दाखवलेल्या धैर्यामुळे विलेपार्लेमध्ये सध्या त्यांचीच चर्चा आहे. जिग्नेश सोलंकी, प्रवीण सोलंकी आणि जितेंद्र प्रजापती अशी विलेपार्ले येथील दुर्घटनेतील देवदुतांची नावे आहेत.

आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी उत्तर भारतीय महिला जितीया उपवास करतात. या उपवासानिमित्त विलेपार्लेमधील श्रद्धानंद रोडवर असलेल्या रुईया बंगल्यातील खासगी विहिरीवर परिसरातील 30 ते 40 महिला सायंकाळी पूजेसाठी आल्या होत्या. या महिला विहिरीच्या काठावर बसून पूजा करत असताना अचानक विहिरीचा कठडा तुटला आणि महिला पाण्यात पडल्या. महिला पाण्यात पडल्या त्यावेळी बंगल्याच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला. या घटनेची माहिती कोणीतरी ‘बालमित्र मंडळ विश्वाचा राजा’ मंडळाचे अध्यक्ष वसंत सोलंकी यांना फोनवरून दिली. त्यांनी लगेचच जिग्नेश सोलंकी, प्रवीण सोलंकी व जितेंद्र प्रजापती यांना ही माहिती दिली. हे तिघे त्याचवेळी तेथून जात असताना त्यांनीही महिलांचा गोंधळ ऐकला व विहिरीच्या दिशेने धाव घेतली. विहिरीमध्ये महिला पडल्याचे पाहून प्रवीण व जिग्नेश यांनी कसलाही विचार न करता विहिरीत उडी घेतली. त्यांच्यापाठोपाठ त्याच रस्त्यावरून जात असलेल्या सिद्धेश या तरुणानेही विहिरीत उडी घेतली, तर जितेंद्रने विहिरीच्या परिसरात असलेली शिडी व दोरखंड विहिरीत सोडले.

- Advertisement -

काही महिलांनी पुढाकार घेत विहिरीत पडलेल्या महिलांना वाचवण्यासाठी आपल्या साड्या काढून विहिरीत सोडल्या. बंगल्यातील मालकानेही आपल्या पत्नीच्या साड्या दिल्या. साड्यांना पकडून असलेल्या महिलांना तिघा तरुणांनी खालून उचलून वर चढवले. तसेच ज्या महिला गटांगळ्या खात होत्या त्यांना साड्यांच्या साहाय्याने बाहेर काढले. प्रवीण, जिग्नेश व सिद्धेश हे तिघे तरुण मोठ्या हिमतीने महिलांना वाचवत असताना विहिरीबाहेरील नागरिकही साड्या, दोरखंड व शिडीचा आधाराने वर येणार्‍या महिलांना बाहेर काढत होते. प्रवीण, जिग्नेश व सिद्धेश या तिघांनी विहिरीत पडलेल्या 12 ते 13 महिलांना वाचवत त्यांना विहिरीच्या बाहेर काढले.

पोलीस व अग्निशमन दलाचे जवान आल्यानंतर हे तिघे तरुण बाहेर पडले. त्यांनी तीन ते चार महिला बुडाल्या असण्याची शक्यता पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांकडे वर्तवली. त्यामुळे पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने विहिरीतील पाणी पंपाच्या मदतीने बाहेेर काढले असता दोन महिलांचे मृतदेह सापडल्याची माहिती जिग्नेश सोलंकी याने दिली. जिग्नेश सोलंकी हा तरुण केबल लाईनचे काम करतो. तर प्रवीण सोलंकी हा पालिकेच्या कूपर हॉस्पिटलमध्ये स्वीपर म्हणून कामाला आहे. तर जितेंद्र प्रजापती हा हॉटेलमध्ये कामाला असून, हे तिघेही सायंकाळी चकाला येथे जात होतेे.

- Advertisement -

…तर ‘त्या’ महिलाही वाचल्या असत्या

शेवटची महिला बाहेर निघेपर्यंत हे तरुण विहिरीमध्येच होते. हे तिघे तरुण वेळेवर धावून आले नसते तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी चर्चा विलेपार्लेमध्ये आहे. 12 ते 13 महिलांना वाचवल्यानंतर जेव्हा या तिन्ही तरुणांना दोन महिला व एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याचे कळले तेव्हा आम्ही 10 मिनिटे लवकर आलो असतो तर त्यांचेही प्राण वाचवू शकलो असतो, अशी खंत जिग्नेश व प्रवीण या दोघांनी व्यक्त केली.

जिग्नेश व प्रवीणचा मदतकार्यात नेहमीच पुढाकार

जिग्नेश व प्रवीण हे ‘बालमित्र मंडळ विश्वाचा राजा’ गणेशोत्सव मंडळाचे सदस्य आहेत. या मंडळाचे कार्यकर्ते विलेपार्लेमध्ये कोणतीही दुर्घटना घडल्यास नेहमीच मदतीसाठी आघाडीवर असतात. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यावर या मंडळाचे कार्यकर्ते प्रवाशांना वाट दाखवण्यापासून ते त्यांना बिस्किट व पाण्याचे वाटप करण्यासाठी पुढाकार घेत असतात. यामध्ये जिग्नेश व प्रवीण हे नेहमीच आघाडीवर असतात, अशी माहिती ‘बालमित्र मंडळ विश्वाचा राजा’ मंडळाचे अध्यक्ष वसंत सोलंकी यांनी दिली.

त्या तरुणांमुळेच वाचले

जितीया उपवासाच्या पूजेसाठी विहिरीवर आम्ही मोठ्या प्रमाणात महिला जमलो होतो. पूजा करत असताना काय घडले हे मला कळलेच नाही. आम्ही सर्व महिला विहिरीत पडलो होतो. काही वेळ डोळ्यासमोर अंधार आला होता. मी पाण्यामध्ये दोन तीन गटांगळ्या खाल्ल्यानंतर माझ्या लक्षात आले की आम्ही विहिरीत पडलो आहोत. मी वाचण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेवढ्यात काही तरुणांनी पाण्यात उडी मारून आम्हाला विहिरीच्या कठड्याजवळ नेले. विहिरी बाहेरून सोडण्यात आलेल्या साड्या, दोरखंड व शिडीच्या मदतीने आम्हाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी ते तरुण प्रयत्न करत होते. त्या तरुणांनी मला एका साडीला पकडायला सांगितले. त्यानुसार मी त्या साडीला पकडून होते. बराच वेळ साडीला पकडल्यानंतर एका तरुणाने मला पाठीमागून उचलून वर ढकलले. मला वर येण्यात फार अडचण येत होत होती. पण विहिरीत उतरलेल्या त्या तरुणांनी मोठ्या हिमतीने मला वर ढकलले. त्यावेळी वर असलेल्या नागरिकांनी वर खेचल्याने मला बाहेर पडणे सहज शक्य झाले, असे विहिरीतून शेवटी बाहेर काढण्यात आलेल्या शारदा गुप्ता यांनी सांगितले.

विहिरीतील खराब पाण्यामुळे त्रास

रुईया बंगल्याच्या परिसरात असलेली विहिर अनेक वर्षांपासून बंद असल्याने तिच्यातील पाणी खराब झाले होते. पाण्यात महिला पडल्यानंतर विहिरीत उडी मारलेले जिग्नेश व प्रवीण यांना बुधवारी दिवसभर पाण्याचा त्रास झाला. प्रवीण सकाळपासून चार ते पाच वेळा उलट्या झाल्या तर जिग्नेशचे डोके व अंग दुखत असल्याचे त्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -