घरमुंबईआधी उंदीर पळवा, मगच नवीन उपकरणे बसवा

आधी उंदीर पळवा, मगच नवीन उपकरणे बसवा

Subscribe

ठेकेदाराने प्रशासनाला ठाणकावले वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील अनागोंदी

नवी मुंबई: मनपा रुग्णालयातील रक्तचाचणी करणार्‍या पॅथोलॉजी विभागालाच उंदरांच्या आणि जागेच्या समस्येने ग्रासलेले आहे. आधी उंदीर पळवा, मगच रक्त तपासणीची नवीन उपकरणे बसवा, अशी भूमिका ही उपकरणे पुरविणार्‍या कंपनीच्या ठेकेदारांनी घेतली आहे. कोपरखैरणे आणि तुर्भे येथील माता-बाल रुग्णालये बंद अवस्थेत तर नेरूळ आणि ऐरोली येथील सुसज्ज रुग्णालय इमारतीमध्ये अपुर्‍या सेवासुविधा त्यामुळे सर्व भार वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयावर पडत आहे. त्यातच येथील रक्त तपासणी करणारी उपकरणे बिघडलेली असल्यामुळे रक्त तपासण्याकरिता रुग्णांना खाजगी सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यातच नवीन रक्त तपासणी उपकरणे महानगरपालिका रुग्णालयात आणण्यात आली आहेत. मात्र त्यांना ठेवणार कुठे आणि आधीची नादुरुस्त उपकरणे दुरुस्त करून झाल्यावर ठेवणार कुठे अशी समस्या आरोग्य विभागासमोर आ वासून उभी राहिली आहे.

जुनी उपकरणे आरोग्य समिती सभापतींना देण्यात आलेल्या केबिनमध्ये ठेवण्याचा विचार सुरू आहे. कारण रुग्णालयाच्या वास्तू आराखड्यात त्या केबिनची जागा रक्त तपासणीसाठीच नियोजित आहे, मात्र तरीही ती जागा सभापतींच्या केबिनसाठी देण्यात आलेली आहे. तसेच औषध वितरण विभाग अर्थात फार्मसी पॅथोलॅबच्या जागेत थाटण्यात आली आहे. अशाप्रकारे रक्त तपासण्या करण्याकरिता नियोजित असलेली जागा आता त्याच कामासाठी कमी पडू लागली आहे. मात्र यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यास येथील आरोग्य अधिकारी धजावत नाहीत.

- Advertisement -

आधी उंदरांचा बंदोबस्त करा…

प्रथम संदर्भ रुग्णालयातील रक्तचाचणी करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रे वारंवार बिघडण्याचे कारण म्हणजे उंदीर असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उंदरांचा वावर आहे. हे उंदीर या उपकरणांच्या वायरी कुरतडत असल्यामुळे ती बिघडतात. त्यामुळे आधी उंदरांचा बंदोबस्त करा मगच नवीन उपकरणे आम्ही सदर ठिकाणी आणून बसवून देऊ, असे उपकरणे पुरविणार्‍या ठेकेदाराने ठणकावले आहे.

रक्ततपासणीसाठी प्रती विद्यार्थी 20 रुपये….

एकीकडे मनपा रुग्णालयातील रक्ततपासणी करणारी यंत्रणा काही दिवसांपासून ठप्प आहे. रुग्ण बाहेरून रक्त तपासण्या करत आहेत. दुसरीकडे महानगरपालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत विविध महागड्या लस टोचण्याची मोहीम राबवत आहे. पण मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना घरून रक्त तपासणी करण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये घेऊन या, असा फतवा काढण्यात आलेला आहे. त्यामुळे महागडे उपचार फुकट देणारी पालिका रक्त तपासणीसाठी विद्यार्थ्यांकडून 20 रुपये का घेत आहे, असा सवाल रिपब्लिकन सेनेचे नवी जिल्हा अध्यक्ष खाजामिया पटेल यांनी केला आहे.

- Advertisement -

नवीन मशीन आल्या असून जागेच्या अडचणीचा असा काही प्रकार सध्या रुग्णालयात नाही, याशिवाय कोणत्याही विद्यार्थाकडून रक्त तपासणीसाठी पैसे आकारले जात नाहीत.
– डॉ. दयानंद कटके, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -