घरमुंबईनालासोपार्‍यात नायजेरियनांना राडा चार जणांना मारहाण

नालासोपार्‍यात नायजेरियनांना राडा चार जणांना मारहाण

Subscribe

27 गाड्यांची मोडतोड

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरमध्ये एका नायजेरियन नागरीकाचा आकस्मित मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास काही नायजेरियन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली आहे. जवळपास 27 गाड्यांचीही तोडफोड केली आहे. तर पाच ते सहा नागरिकांना मारहाण ही केली आहे.

बुधवारी रात्री दोनच्या सुमारास जोसेफ नावाच्या एका नायजेरियन नागरिकाचा आकस्मित मृत्यू झाला होता. येथील गणेश शाळेजवळ जोसेफचा मृतदेह आढळून आल्यानंतर भडकलेल्या नायजेरियन नागरिकांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन रागाच्या भरात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा, टॅक्सी, टँकर, बाइक या वाहनांच्या काचा फोडल्या. त्यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

- Advertisement -

जोसेफ या नायजेरियन नागरिकाला येथील स्थानिक तरुणांनी मारहाण केली होती. त्यात त्याला उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आमचे नागरिक भडकल्याची कबूली देत तोडफोड केल्याचे दाऊद या नायजेरियन नागरिकाने पोलिसांना सांगितले.

नायजेरियन लोकांनी केलेल्या हल्ल्यत फुरकान खान, सूरज जैस्वाल, सद्दाम खान, धर्मेंद्र राजपूत, निसार खान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर जवळपास दहा ते पंधरा स्थानिक नागरीक किरकोळ जखमी झाले आहेत. नायजेरिन लोकांनी केलेल्या हल्ल्यानंतर प्रगतीनगर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. यापरिसरात नायजेरियन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आम्हाला होतो. असा आरोप येथील लोकांनी केला आहे. सध्या या संपूर्ण भागात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे. येथे काही नायजेरियन नागरिक राहतात. मात्र ते आता घराबाहेर निघू शकत नाही. स्थानिक नागरिकांची त्यांना भीती वाटत असल्याची माहिती एका नायजेरियनने दिली.

- Advertisement -

पोलिसांनी सध्या जोसेफ संदर्भात अपमृत्यू दाखल करून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पावलेल्या नायजेरीयन नागरिकाची खरी ओळख पटली नसून केवळ त्याचे नाव जोसेफ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार या इसमाच्या मृत्यूचे कारण समजले नसल्याने पोलिसांनी अकस्मात मुत्यूची नोंद केली आहे. तसेच त्या इसमाचे पारपत्र, भारतातील व्हिजा अथवा त्याची खरी ओळ्ख करून देणारी कोणतीही कागदपत्रे मिळाली नसल्याने त्याची खरी ओळख पटलेली नाही. ज्या नागरिकांनी रात्री वाहनांची तोडफोड केली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -