घरमुंबईकल्याण-नगर चौपदरीकरण; माळशेज घाटात दोन भूयारी मार्गिका!

कल्याण-नगर चौपदरीकरण; माळशेज घाटात दोन भूयारी मार्गिका!

Subscribe

माळशेज घाटात दोन टनेल मार्गिका प्रस्तावित असून यांना मंजूरी मिळताच माळशेज घाटातील प्रवास सुखकर होणार आहे.

ठाण्याहून पुणे, अहमदनगरला जाताना लागणारा माळशेज घाट हा धोकादायक समजला जातो. पावसाळ्यात घाटात दरड कोसळल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे घाटातील वाट धोक्याची समजली जाते. पण आता माळशेज घाटातून सुरक्षित प्रवास होणार आहे. माळशेज घाटात दोन भूयारी मार्गिका प्रस्तावित असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर) बनविण्यासाठी एजन्सी नेमण्यात आली आहे. त्यामुळे माळशेज घाटातील धोक्याचा प्रवास सुरक्षित आणि जलद होणार आहे.

कल्याण-मुरबाड रेल्वेला मंजूरी

ठाण्यापासून ९० किमी अंतरावर माळशेज घाट आहे. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. त्यामुळे अनेकवेळा वाहतूक बंद करावी लागते. त्यामुळे ही वाहतूक कर्जत, खंडाळा व कसारा या मार्गाने वळवली जाते. रेल्वे मार्ग नसल्यामुळे नगर-पुण्याकडे जाणारा माळशेज मार्ग हा एकमेव पर्याय असल्याने कल्याण-नगर रेल्वे मार्ग व्हावा यासाठी अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र पहिल्या टप्प्यात कल्याण-मुरबाड या रेल्वेला मंजूरी मिळाली असून त्याच्या सर्व्हेक्षणाचे कामही झाले आहे.

- Advertisement -

वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार

कल्याण-नगर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. सुमारे १२ हजार कोटी रूपये खर्चाचे काम आहे. मात्र मुरबाड ते माळशेज घाटात दोन प्रकारचे टनेल मार्ग प्रस्तावित आहे. साडेतीन किमीचे टनेल आहेत. घाटातून मढ गावापर्यंत ही टनेल मार्गिका असणार आहे. या टनेल मार्गिकेमुळे दोन किमीचे अंतरही कमी होणार आहे. तसेच वाहतूक कोंडीतून मार्ग निघणार असून प्रवास सुरक्षित होणार आहे.

चीनच्या धर्तीवर तरंगता पूल

माळशेज घाट हे पर्यटकांचे आकर्षण ठिकाण म्हणूनच ओळखले जाते. सुट्टीच्या दिवशी माळशेज घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीही होत असते. पावसाळ्यातील हिरवाई आणि कोसळणारे धबधबे यामुळे घाटाचे मनमोहक रूप पहायला मिळते. मात्र आता माळशेज घाटात चीनच्या धर्तीवर तरंगता पूलही बांधण्यात येणार आहे. घाटमाथ्यावर शासनाचे रेस्ट हाऊस उभारले आहे. त्याला लागूनच हा पूल प्रस्तावित आहे. चीनचा पूल हा १८ मीटर असून, माळशेज घाटातील पूल हा २५ मीटर असणार आहे. त्यामुळे माळशेज घाटावरील पूल हा जगातील सर्वात मोठा पूल ठरणार आहे. डीपीआर तयार करण्यासाठी साडेपाच कोटी रूपये खर्च होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून कल्याण-नगर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. माळेशज घाटात दरड कोसळत असल्याने सुरक्षित प्रवासासाठी दोन टनेल मार्गिका करण्याच्या मागणीला मंजुरी मिळाली आहे. त्याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही माळशेज घाटात काचेच्या तरंगत्या पुलाच्या कामास मंजुरी दिली आहे. चीनच्या पूलापेक्षाही हा पूल मोठा असून, जगाच्या नकाशावर झळकणार आहे. तसेच मुरबाडचा एमएमआरडीएत समावेश झाल्याने मुरबाडच्या विकासाचा मार्ग अधिकच खुला झाला आहे.
किसन कथोरे, आमदार, मुरबाड विधानसभा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -