घरमुंबईमुंबईतील झाडांवर विषप्रयोग

मुंबईतील झाडांवर विषप्रयोग

Subscribe

मुंबईत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांच्या तसेच जाहिरातींच्या आड येणारी झाडे विषप्रयोग करून मारून टाकण्याचा सपाटा सुरू आहे. प्रचंड वाढलेली झाडे अचानक मान टाकू लागल्याने गर्द झाडी लोप पावत चालल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसू लागले आहे.

मुंबईत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांच्या तसेच जाहिरातींच्या आड येणारी झाडे विषप्रयोग करून मारून टाकण्याचा सपाटा सुरू आहे. प्रचंड वाढलेली झाडे अचानक मान टाकू लागल्याने गर्द झाडी लोप पावत चालल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसू लागले आहे. याकडे मुंबई महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिक असलेल्या आशा बांदेकर यांनी केला आहे. स्वत: बांदेकर यांनी अनेकदा तक्रारी केल्या. पण त्यांच्या तक्रारींचीही दखल पालिकेने घेतली नसल्याचे त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, याआधी बेकायदेशीरपणे झाडे तोडल्या-प्रकरणी धारावी येथील सदाशिव कांबळे यांना न्यायालयाने सात दिवस तुरुंगात पाठवले.

प्रभादेवी सिद्धीविनायक मंदिराच्या समोरील बाजूस चिंतामणी ज्वेलर्सजवळ कोटक महिंद्रा व स्टँडर्ड चार्टर्ड नावाची दोन खाजगी एटीएम केंद्र आहेत. या एटीएम केंद्राजवळून जाताना झाडांची पाने मोठ्या प्रमाणात गळताना दिसतात. अधिक विचारपूस केली असता काही दिवसांपूर्वी त्या झाडाच्या खाली रात्री कुणीतरी अ‍ॅसीडसारखे विषारी द्रव्य टाकल्याची माहिती बांदेकर यांनी दिली. आधीच मुंबईत झाडांची संख्या कमी. त्यात झाडांवर विषप्रयोग करून ती मारली जात आहेत. याकडे पालिकेने लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे. पालिकेने झाडे वाचवा-झाडे वाढवा, मोहीम योजिली होती. पण दुसरीकडे मोठ्या संख्येने झाडे अचानक मरताहेत. ही झाडे वाचवण्यासाठी पालिकेने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे बांदेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रभादेवी प्रमाणेच माटुंगा येथील सिटीस्टार चित्रपटगृहाशेजारी, पोद्दार महाविद्यालय, रहेजा महाविद्यालय, मॅजेस्टिक, वेलिंगकर इन्स्टिट्यूट, पंतनगर घाटकोपर येथील टेक्निकल हायस्कूल बस स्टॉपच्या बाजूला असलेल्या बॅलेनो व्हिस्टा इमारतीच्या समोर, टेक्निकल हायस्कूलच्या हद्दीत असलेल्या अपना सहकारी बँकेच्या समोर झाडांवर विषप्रयोग केल्याचे दिसून येते. विषप्रयोग झाल्यावर झाडे मरतात. ती सुकल्याचे निमित्त करत ही झाडे कापून टाकण्यात येत आहेत. अधिक चौकशी केली असता मॉल, रहिवाशी व व्यावसायिक इमारतींच्या प्रवेशद्वारासमोर, दुकान मॉल यांच्या जाहिरातींसमोर येणारी झाडे जाहिरातींसाठी खुलेआम मारून तोडून टाकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

दादर येथील शिवसेना भवनसमोरील गुलमोहराचे झाड सुकल्यानंतर पडून गेले. विषप्रयोग करण्याआधी या झाडांच्या मुळांवर सिमेंटचे आवरण दिले जाते. यामुळे झाडांच्या मुळांची वाढ रोखली जाते. यामुळे ती हळूहळू निस्तेज होतात. ही कृती अधिक जलद पूर्ण व्हावी, म्हणून मग संबंधितांकडून झाडांच्या मुळांवर अ‍ॅसिडसारख्या विषाचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले. झाड मारण्यासाठी आणखी एक क्लुप्ती रचली जात आहे. ती म्हणजे मोठाले खिळे झाडांमध्ये रुतवले जातात. यामुळेही झाड मरते. मध्यंतरी याविरोधात ’खिळे मुक्त झाड’ ही संकल्पना राबवण्यात आली होती. ’आंघोळीची गोळी’ या संस्थेचे तुषार वारंग यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. मुंबईत 30 लाख झाडे आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात झाडांची संख्या खूप कमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या मानकानुसार प्रत्येक व्यक्तीमागे एक झाड असावे. मात्र सध्या चार व्यक्तीमागे एक झाड असल्याचे वारंग यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, बेकायदेशीरपणे झाडे तोडणे, झाडांना इजा करणे, विषप्रयोग करणे, झाडे तोडणार्‍या किती लोकांवर कारवाई केली, याची माहिती महापालिकेच्या उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडे आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ही माहिती सर्व विभाग कार्यालयांतून मागवावी लागेल, असे सांगण्यात आले. मात्र विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत सात विभाग कार्यालये आहेत. त्यापैकी प्रत्येक विभाग कार्यालयात झाडांना विविध प्रकारे इजा करण्याच्या वर्षाकाठी अवघ्या 15 ते 20 तक्रारी येतात. त्यामधील विषप्रयोग करून झाडे मारण्याच्या फक्त 3 ते 4 तक्रारी असतात. याबाबत पोलिसांत तक्रारी करण्यात येतात. न्यायालयात प्रकरणे जातात. मात्र त्यावर काय कारवाई झाली याची माहिती या कार्यालयांना नसते.

झाड तोडल्याने गेले तुरुंगात

धारावी येथील कपिलवस्तू को. ऑप. हाऊसिंग सोसायटीचे सरचिटणीस सदाशिव कांबळे यांनी त्यांच्या इमारतीच्या आवारातील जांभूळ, नारळ, गुवा, गुलमोहर अशी चार झाडे वृक्ष छाटणीच्या नावाने कापली. सोसायटीमधील रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार केली. पोलिसांत तक्रार करून न्यायालयात प्रकरण गेले. सुनावणीनंतर कांबळे यांना दोन हजार रुपये दंड व सात दिवसांची सजा सुनावण्यात आली.

श्वेतपत्रिका काढावी

मुंबई महापालिका ’आमची मुंबई हरित मुंबई’ अशी जाहिरात करते. मात्र मुंबई खरेच हरित आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महापालिकेकडून झाडांचा सांभाळ योग्य प्रकारे केला जात नसल्याने शहरातील झाडांची संख्या कमी झाली आहे. यामुळे शहरातील झाडांची नेमकी संख्या समोर यावी म्हणून श्वेतपत्रिका काढावी. – राखी जाधव, गटनेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस.

’पेन फ्री ट्री’ उपक्रम

विकासकांकडून साईटच्या कामाआड येणारी झाडे विषप्रयोग करून तोडली जातात. याकडे पालिका दुर्लक्ष करते हे दुर्दैवी आहे. विषप्रयोग केला जातो त्याचप्रमाणे झाडांवर जाहिरातींचे फलक लावण्यासाठी खिळे मारले जातात. पालिका कारवाई करते, जाहिरातींचे बॅनर काढून नेते. मात्र खिळे तसेच सोडून देते. दादर ते माहीम दरम्यान मुख्य रस्त्यावरील 300 ते 325 झाडांची आम्ही पाहणी केली. यात 125 झाडांवर खिळे मारल्याचे निदर्शनास आले. झाडांना वेदना होऊ नयेत, म्हणून ’पेन फ्री ट्री’ उपक्रम राबवून झाडांवर मारलेले खिळे काढून टाकण्यात आले. – जय श्रींगारपुरे, जय फाऊंडेशन

झाडांना कोणत्याही प्रकारची इजा करणे, जाळणे, खिळे मारणे, केमिकल टाकणे यावर निर्बंध बसावेत म्हणून अर्बन हट अ‍ॅक्ट १९७५च्या नियम ७(३)नुसार संबंधितांना १५ दिवस ते १ वर्ष या प्रमाणे शिक्षा सुनावली जाते. याशिवाय १० हजार ते एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो. उद्यान अधिकार्‍यांकडे तक्रार आल्यावर ती वृक्ष प्राधिकारणाकडून पोलिसांत पोहोचवली जाते. संबंधित झाड मारल्यामुळे नेमका कुणाला फायदा होईल याचा पोलीस तपास करून गुन्हा नोंदवतात. झाडांना इजा पोहचवण्याचे प्रकार नागरिकांनी निदर्शनास आणल्यास कारवाई करू. – जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -