घरमुंबईशाळेतून निघून गेलेल्या मुंबईतील 'त्या' दोघी दिल्लीत सापडल्या

शाळेतून निघून गेलेल्या मुंबईतील ‘त्या’ दोघी दिल्लीत सापडल्या

Subscribe

अंधेरीतील एका खासगी शाळेच्या परिक्षा केंद्रातून शेवटचा पेपर दिल्यानंतर अचानक गायब झालेल्या त्या दोन्ही अल्पवयीन मुली दिल्लीत सापडल्या आहेत.

अंधेरीतील एका खासगी शाळेच्या परिक्षा केंद्रातून शेवटचा पेपर दिल्यानंतर अचानक गायब झालेल्या त्या दोन्ही अल्पवयीन मुली दिल्लीत सापडल्या असून या दोघींचा ताबा घेऊन डी. एन. नगर पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईला निघाले आहे. मंगळवार, २६ मार्चच्या सकाळपर्यंत दोन्ही मुलींना घेऊन संबंधित पथक मुंबईत येतील असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी सांगितले. या घटनेमागील कारण समजू शकले नाही. त्यांच्या जबानीनंतर त्या दोघीही दिल्लीत का गेल्या होत्या याचा उलघडा होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अंधेरी परिसरात राहणार्‍या पंधरा आणि सोळा वयोगटातील या दोन्ही मुली तिथे असलेल्या एका शाळेत दहावीत शिकतात.

काय आहे प्रकरण

सध्या त्यांची दहावीची परिक्षा सुरु होती. शुक्रवारी त्यांचा भूगोलाचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे त्या दोघीही अंधेरीतील भवन्स कॉलेजजवळील एका शाळेतील परिक्षा केंद्रात परिक्षा देण्यासाठी आल्या होत्या. परिक्षा संपल्यानंतर त्या घरी न जाता अंधेरी रेल्वे स्थानकात आल्या. त्यानंतर त्या गायब झाल्या होत्या. दुसरीकडे परिक्षा संपल्यानंतर बराच वेळ होऊनही त्या घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरु केला. मात्र त्या कुठेच सापडल्या नाही. एकाच वेळेस दहावीतील दोन मुली मिसिंग झाल्याने त्यांच्या पालकांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.

- Advertisement -

असा केला तपास

या दोन्ही मुलींचा शोध घेताना पोलिसांनी शाळेपासून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. यातील काही फुटेजमध्ये त्या शाळेतून निघाल्याचे तसेच अंधेरी रेल्वे स्थानकात दुपारी सव्वादोन वाजता पोहचल्याचे दिसत होते. त्यानंतर त्या दोघीही मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात गेल्या. सायंकाळी त्या दोघीही निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला निघून गेल्या. या दोघींनी राजधानी एक्सप्रेसचे तिकिट काढले होते, सीसीटिव्ही फुटेजमध्ये त्या दोघीही निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसने निघून गेल्याचे समजताच डी. एन. नगर पोलिसांनी दिल्ली रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली होती. दुसर्‍या दिवशी त्या दोघीही दिल्लीत येताच त्यांना दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ही माहिती मिळताच डी. एन. नगर पोलिसांचे एक विशेष पथक दिल्लीला गेले आहे. या दोघींचा ताबा पोलिसांना देण्यात आला असून त्यांना पुढील चौकशीसाठी मंगळवारपर्यंत मुंबईत आणले जाणार आहे. यातील एक मुलगी पत्रकाराची तर दुसर्‍या मुलीचे वडिल दुबईत नोकरीला आहे. तिने परिक्षा संपल्यानंतर घरातून पळून जाण्याची पहिल्यापासून योजना बनविली होती. या योजनेत तिने दुसर्‍या मुलीला तयार केले होते. त्यासाठी तिने आधीपासून घरातून काही पैसे आणि दागिने घेतले होते. त्यांच्याकडे काही पैसे आणि दागिने सापडल्याचे बोलले जाते. या दोघींना घरातून काही त्रास होता, अभ्यासाच त्यांनी टेन्शन घेतलं होतं का, घरातून निघून जाण्याचा त्यांनी निर्णय का घेतला याचा त्यांच्या जबानीनंतर खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या दोघीही सुखरुप असून त्यांना मंगळवारपर्यंत मुंबईत आणले जाईल असे पोलिसांकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आले आहे. या दोघीही सुखरुप असल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

यासंदर्भात बोलताना एका अधिकार्‍याने सांगितले की, परिक्षा संपल्यानंतर घरी न जाता पळून जाण्यामागे त्यांचा काय उद्देश होता, त्यांना तसे करण्यास कोणी प्रवृत्त केले का, या संपूर्ण प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा आता पोलीस तपास करणार आहे. त्यानंतर त्यांचा ताबा त्यांच्या पालकांना सोपविण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -