घरमुंबईपालकांशी झालेल्या भांडणानंतर दोन अल्पवयीन मुलींनी घर सोडले

पालकांशी झालेल्या भांडणानंतर दोन अल्पवयीन मुलींनी घर सोडले

Subscribe

गुन्हे शाखेच्या सतर्कमुळे दोन्ही मुली मुंबईत सापडल्या

क्षुल्लक घरगुती कारणावरुन पालकांशी झालेल्या भांडणानंतर दोन अल्पवयीन मुलींनी घर सोडले. गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांच्या सतर्कमुळे या दोन्ही मुली मुंबईत सापडल्या. या दोघींना पुढील चौकशीसाठी वर्ध्याच्या सावंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोळा वर्षांच्या या दोन्ही मुली मैत्रिणी असून वर्धाच्या सावंगी परिसरातील गावी राहतात. सध्या त्या दोघीही तेथीलच एका कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्गात शिकत आहेत. त्यांच्या घरात नेहमी पालकांमध्ये घरगुती वाद होता, त्यात त्यांना कला शाखेत प्रवेश घ्यायचा होता. पालकांनी जबदस्तीने त्यांना कला शाखेऐवजी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता, त्यामुळे त्यांच्या मनात राग होता.

घरातील घरगुती वादामुळे अभ्यास करता येत नसल्याने या दोघींनीही घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्या दोघीही दोन दिवसांपूर्वी घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. हा प्रकार त्यांच्या पालकांना समजताच त्यांनी सावंगी पोलीस ठाण्यात दोन्ही मुलींची मिसिंग तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला होता.

- Advertisement -

माहुल व्हिलेज परिसरातून ताब्यात

ही शोधमोहीम सुरू असतानाच या दोन्ही मुली मुंबईत आल्या आहेत, अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त नेताजी भोपळे, पोलीस निरीक्षक संजय निकुबे यांच्या पथकातील पठाण, बागल, वळवी, गावित, कोळी, नागवेकर, काळे, शिल्पा मुरुडकर यांनी या मुलींचा शोध सुरू केला होता. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनससह जुहू चौपाटी परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला होता. या मुली चेंबूर येथे गेल्याची माहिती मिळताच या पथकाने माहुल व्हिलेज परिसरातून दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.

दोन्ही मुली सुखरूप

चौकशीत त्यांनी घरगुती वादातून पालकांशी झालेल्या भांडणानंतर घर सोडल्याची कबुली दिली. मुंबईत येऊन नोकरीसह पुढील शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस होता, त्यासाठी त्या दोघीही वर्धा येथून मुंबईत आल्या होत्या. मुंबईत आल्यानंतर त्या जुहू चौपाटीसह इतर ठिकाणी गेल्या. त्यानंतर त्या चेंबूर येथे आल्या होत्या. या दोन्ही मुली सापडल्यानंतर त्याची माहिती नंतर सावंगी पोलिसांना देण्यात आली होती. संबंधित पोलीस मुंबईत येताच त्यांचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला आहे. या दोन्ही मुलींना वर्धा येथे नेण्यात आले. दोन्ही मुली सुखरुप मुंबईत सापडल्याने त्यांच्या पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -