घरमुंबईवाशी रुग्णालय हाऊसफुल्ल,रुग्णांना जमिनीवर उपचार

वाशी रुग्णालय हाऊसफुल्ल,रुग्णांना जमिनीवर उपचार

Subscribe

हवामानातील बदलांमुळे विषाणूजन्य तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यात मलेरिया व डेंगूचेदेखील रुग्ण आहेत. नवी मुंबई बाहेरील रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. त्यात कोणताही दुजाभाव केला जात नाही.अचानक रुग्णालयात रुग्ण वाढल्याने धावपळ वाढली आहे. -डॉ. दयानंद कटके, मुख्य वैद्यकीय अधिकारी (मनपा)

नवी मुंबई :- वारंवार होणार्‍या हवामान बदलाने नवी मुंबई शहरात रोगराईचे प्रमाण वाढले असून त्यामुळे रुग्णालयात गर्दी होऊ लागली आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक रुग्णांनी पालिकेच्या रुग्णालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पालिकेचे हॉस्पिटल फुल्ल झाले असून उर्वरित रुग्णांना चक्क जमिनीवर उपचार घ्यावे लागत आहे.

ताप, डोकेदुखी, अंगदुखी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढली आहे. हा ताप संसर्गजन्य म्हणजे व्हायरल प्रकारचा असून, त्यासाठी पाच ते सात दिवस औषधोपचार घेण्याची गरज भासत आहे.पावसाळ्यातील तापाच्या उपचारांसाठी पालिकेने सुरू केलेल्या ओपीडीमध्ये रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते. गेल्या महिन्यापासून असलेल्या दमट -उष्ण हवामानाचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होऊ लागला आहे.

- Advertisement -

सप्टेंबर महिना उजडताच विषाणूजन्य तापाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यात तुर्भे झोपडपट्टी परिसरात तर साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढल्याने तापाच्या रुग्ण वाढले आहेत. डेंगू व मलेरियाचे रुग्ण जरी कमी झाले असले तरी तापाचे रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यात खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याने सर्वसामान्य रुग्णाचा लोंढा वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात वाढू लागला आहे.

तुर्भे आणि कोपरखैरणेयेथील पालिका रुग्णालय अडीच वर्षांपासून बंद असल्याने रुग्ण वाशी रुग्णालयात धाव घेत आहेत. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर व तिथल्या स्टाफवर होऊ लागला आहे. वाशी रुग्णालयात नवी मुंबई बाहेरील पनवेल, उरण, ठाणे, शहापूर, मानखुर्द, गोवंडी आदी ठिकाणचे रुग्ण येत असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

सध्या वाशी रुग्णालय रुग्णांच्या संख्येने हाऊसफुल्ल झाल्याने तेथील खाटा रिकाम्या नाहीत. त्यामुळे रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार करावे लागत आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात अपेक्षित सेवा मिळत नसल्याने शेकडो रुग्ण चांगली सेवा मिळावी म्हणून वाशी रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णांना खाटा ही कमी पडू लागल्याने जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांना उपचार देण्याची वेळ पालिकेवर आली आहे.

ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 55 संशयित रुग्ण आढळले होते, त्यापैकी 1 रुग्णाला डेंग्यू उघड झाला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत 63 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकालाही डेंग्यूची लागण झाल्याचे आढळले नाही. तसेच ऑगस्टमध्ये 23 मलेरियाचे रुग्ण आढळले होते. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत 12 रुग्ण मलेरियाग्रस्त आहेत. अतिसाराच्या रुग्णांत वाढ झाली असून ऑगस्टमध्ये ३ तर सप्टेंबरमध्ये 10 रुग्ण आढळले आहेत. गॅस्ट्रो व विषमज्वर रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ऑगस्टमध्ये गॅस्ट्रोचे 7 रुग्ण आढळले, सप्टेंबरमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. ऑगस्टमध्ये विषमज्वराचे 10 रुग्ण होते, तर सप्टेंबरमध्ये 6 रुग्णांची नोंद झाली आहे.

 काही दिवसांपूर्वी बोनसरी गावात राहणारी राजीदुन निसा अब्दुल नजीर (10) या मुलीचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तापाने मृत्यू झाल्याची घटना घडली. दोन दिवस ताप येत असल्याने तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -