घरमुंबईराणीबागेत आता पक्ष्यांचे मुक्त विहारही अनुभवा

राणीबागेत आता पक्ष्यांचे मुक्त विहारही अनुभवा

Subscribe

पक्ष्यांसह बिबट्या, अस्वल, तरस,कोल्ह्यांचे रविवारपासून दर्शन

मुंबईतील राणीबागेत पेंग्विनसह काही प्राण्यांचे दर्शन मुंबईकरांना घडल्यानंतर आता बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा यांच्या पिंजर्‍यांचे बाधंकाम पूर्ण झाल्यामुळे आता हे प्राणी पर्यटकांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे राणीबागेत पाच मजली उंच पक्षी दालन उभारण्यात आले आहे. या पिंजर्‍यांना पक्ष्यांना मुक्त विहार करता येणार आहे. या सर्व प्राणी आणि पक्ष्यांचा पिंजर्‍यांचे लोकार्पण येत्या रविवारी सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते पार पडणार आहे.

राणीबागेत गेल्या काही महिन्यांपूर्वी नवीन पाहुणे आले आहेत. यामध्ये कर्नाटकातील मंगलोर येथील प्राणिसंग्रहालयातून आणलेला बिबट्या आणि कोल्हा, म्हैसूर येथून आणलेला तरस, गुजरातमधून आणलेला अस्वल आदींचा समावेश आहे. पाहुण्या प्राण्यांसाठीच्या पिंजर्‍यांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच प्राण्यांचे क्वारंटाईनमधील कालावधी योग्यप्रकारे पार पडल्यानंतर त्यांना आता पिंजर्‍यात लोकांच्या दर्शनासाठी ठेवले जाणार आहे.

- Advertisement -

बिबट्या, अस्वल, तरस, कोल्हा अशा प्राण्यांच्या पाच पिंजर्‍यांचे लोकार्पण करून त्यात या प्राण्यांचे दर्शन घडवले जाणार आहे. त्याप्रमाणे भारतातील पहिले पक्ष्यांसाठीचे वैशिष्ट्यपूर्ण मुक्त विहार दालन जनतेसाठी खुले होणार आहे. या दालनात विविध प्रजातींचे १०० पक्षी एकत्र नांदणार आहेत. हा पिंजरा वैशिष्ट्यपूर्ण काचेचा असल्याने पर्यटकांना या पक्ष्यांचा मुक्त विहार न्याहाळता येणार आहे, तसेच येथील पुलावरून सेल्फीचा आनंदही लुटता येणार आहे.

कासवांसाठीही दालन
राणीबागेत स्वतंत्र कासवासाठीही स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. या दालनात पाण्यातील कासव अर्थात टर्टल आणि जमिनीवरील कासव अर्थात टॉरटॉईज हे एकाच ठिकाणी बघता येणार आहेत. सुमारे १ हजार २३४ चौरस फूट एवढ्या क्षेत्रफळाच्या जागेवर एक छोटे तळे विकसित करण्यात आले. तसेच जमिनीवरील कासवांसाठी छोटी घरटीही आहेत.

- Advertisement -

रविवारी होणार लोकार्पण
राणीबागेतील प्राणी व पक्षी यांच्या वेगवेगळ्या ६ दालनांचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते पार पडणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्‍या लोकार्पण सोहळयात सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -