घरमुंबईनगरसेवकांचा कार्याचा गौरव होणार कधी?

नगरसेवकांचा कार्याचा गौरव होणार कधी?

Subscribe

उत्कृष्ट नगरसेवकांना पुरस्कार देण्यास महापालिका अनुत्सुक,ठराव मंजूर होवूनही अंमलबजावणी केली जात नाही

मुंबई महापालिकेवर निवडून येणार्‍या नगरसेवक आणि नगरसेविकांच्या कार्याचे मुल्यमापन करून दरवर्षी पाच नगरसेवकांचा महापालिकेच्यावतीने पुरस्कार देवून सन्मान करण्याचा ठराव मंजूर होवूनही याचा विसर महापालिकेला पडला आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय गटनेते आणि आयुक्त यांची समिती यासाठी गठीत करून पाच नगरसेवकांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु महापालिकेलाचा याचा विसर पडल्याने, नगरसेवक आपल्या कार्याच्या गौरवापासून वंचित राहत आहेत.

मुंबई महापालिकेच्या नगरसेवक आणि नगरसेविकांच्या कार्याचे योग्य निकषांच्या आधारे मुल्यमापन करून, दस्वर्षी किमान पाच नगरसेवकांना महापालिकेच्यावतीने पुरस्कार देवून सन्मान करण्यात यावा,अशी मागणी तत्कालिन नगरसेवक अ‍ॅड. मनमोहन चोणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. महापालिकेवर निवडून येणारे नगरसेवक हे दिवस-रात्र जनसेवेसाठी तत्पर असतात. जनहितासाठी विविध प्रश्न मांडताना अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावत असल्याने त्यांच्या कार्याचे मुल्यमापन करून त्यांना पुरस्कार देत सन्मान केला जावा,अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीनुसार उत्कृष्ट नगरसेवक पुरस्कारासाठी तयार करण्यात आलेल्या निकषांंना ९ ऑक्टोबर २०१५मध्ये मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये एप्रिल ते मार्च या एका वर्षांच्या कालावधीतील निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांनी अर्जासहित आपल्या विभागात केलेल्या लोकापयोगी कामांची माहिती, विविध सभांमधील चर्चेतील सहभाग इत्यादी बाबतची कागदोपत्री माहिती, महापौरांकडे सादर केल्यास योग्य सदस्यांची निवड करण्यास मदत होईल. उत्कृष्ट नगरसेवक पुरस्कारासाठी सादर केलेल्या अर्जाची, गटनेत्यांच्या सभेत मंजूर करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पडताळणी केल्यांनतर निवड समिती गुणांकन आधारे ५ नगरसेवकांची उत्कृष्ट नगरसेवक व नगरसेविका म्हणून शिफारस करेल व निवड करेल. गटनेत्यांच्या सभेत मंजुरी दिल्यानुसार महापौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय गटनेते व आयुक्त हे सदस्य असलेल्या समितीत पाच उत्कृष्ट नगरसेवकांची निवड करण्यात येईल.

- Advertisement -

१० जून २०१९ रोजी गटनेत्यांच्या सभेत या ठरावाला मंजुरी दिल्यानंतरही, प्रत्यक्षात पाच उत्कृष्ट नगरसेवकांची निवड करण्यासाठी कोणताही प्रयत्न महापालिकेकडून सुरु नाही. काही दिवसांपूर्वी प्रभाग समिती अध्यक्ष व विभागीय सहायक आयुक्तांसह विभागातील उत्कृष्ट कर्मचारी व अधिकार्‍यांची निवड करून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. परंतु महापालिका नगरसेवकांचा कधी गौरव करणार असा प्रश्न विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -