घरपालघरविजवितरणाचे जाळे जुनाट झाल्याने नागझरी परिसरात विजेचा लपंडाव

विजवितरणाचे जाळे जुनाट झाल्याने नागझरी परिसरात विजेचा लपंडाव

Subscribe

नागझरी परिसरातील घरगुती वीज ग्राहकांसाठी वीज पुरवठा करणार्‍या विजवाहिन्या आणि गंजलेले खांब बदलून वीज वितरणाचे जाळे सुधारण्याची मागणी केली जात आहे.

मनोर: क्रशर आणि रेडिमिक्स सिमेंट प्रकल्पांमुळे महावितरण कंपनीला मोठा महसूल मिळवून देणार्‍या नागझरी भागात घरगुती वीज ग्राहकांना विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे.विजवितरणाचे जाळे जुनाट झाले आहे. विजवाहिन्या लोम्बकळत असून खांब गंजलेल्या अवस्थेत आहेत.गंजलेले खांब लहानमोठ्या भारामुळे जमीनदोस्त होत असल्याने विजवाहिन्या तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. नागझरी परिसरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरगुती वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे.ग्राहक आणि ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारींकडे महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नागझरी परिसरातील घरगुती वीज ग्राहकांसाठी वीज पुरवठा करणार्‍या विजवाहिन्या आणि गंजलेले खांब बदलून वीज वितरणाचे जाळे सुधारण्याची मागणी केली जात आहे.

चिल्हार बोईसर रस्त्यावरील नागझरी,किराट आणि लालोंडे परिसरात असलेल्या चांगल्या दर्जाच्या दगडांच्या खाणींमुळे क्रशर उद्योग फोफावला आहे.क्रशर उद्योगापाठोपाठ रेडिमिक्स काँक्रीट,क्रश सँड आणि हॉट मिक्स डांबर प्लांट उभे राहिले आहेत.नागझरी फिडरला महावितरणच्या बोईसर पूर्वेकडील तारापूर टेक्स्टाईल पार्क उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो.महावितरण कंपनीकडून उद्योगांसाठी अखंडित वीजपुरवठा केला जातो.मोठा महसूल मिळत असल्याने वीज वितरण वाहिन्या वेळीच बदलल्या जातात,गंजलेले खांब बदलून विजवीतरणाचे जाळे सुस्थितीत ठेवले जाते. परंतु याच भागातील घरगुती वीज ग्राहकांना केल्या जाणार्‍या विजेचा लपंडाव सुरू असल्याने ग्राहकांमध्ये महावितरण कंपनी कडून अन्याय केला जात असल्याची भावना घरगुती वीज ग्राहकांमध्ये बळावत आहे. नागझरी ,चरी,निहे,लालोंड ,किराट,बोरशेती,लोवरे आणि कटाळे गावांमधील घरगुती वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी असलेल्या वीज वाहिन्या आणि खांबाची दुरवस्था झाली आहे.गंजलेले खांब आणि लोम्बकळणार्‍या तारा असे चित्र आहे.अनेक वर्षांपासून विजवाहिन्या बदलण्यात आल्या नसल्याने बिघाड होऊन विजवाहिन्या तुटण्याच्या घटना नेहमीच होत असतात. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. विजवाहिन्या तुटून गायी, म्हशी विजेचा धक्का लागून मेल्याच्या घटना घडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.जुनाट वीज वाहिन्यांमुळे होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे पालघर तालुक्यातील सर्वाधिक महसूल देणार्‍या नागझरी परिसरातील घरगुती वीज ग्राहकांवर महावितरण कंपनीकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.नागझरी परिसरातील घरगुती ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी विजवाहिन्यांचे जाळे अद्ययावत करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

 

नागझरी परिसरात महावितरण कंपनीकडून घरगुती ग्राहकांसाठी वीज पुरवठयात होत असलेल्या लपंडावाबाबत ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार करण्यात आला होता.परंतु, महावितरण कंपनीकडून ग्राहक आणि ग्रामपंचायतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे.जीर्ण झालेले खांब आणि विजवाहिन्या तुटून जीवितहानी झाल्यास महावितरण कंपनी जबाबदारी असेल.नागझरी गावात केबल लाईन टाकताना अ‍ॅल्युमिनियम विजवाहिन्या काढण्यात आल्या नाहीत.अजूनही नवीन केबलमधून वीजपुरवठा केला जात नाही.ठेकेदारांनी बिले काढण्याच्या उद्देशाने केबल टाकण्याचे सोपस्कार पूर्ण केले.
– सुदेश पाटील, उपसरपंच, नागझरी ग्रामपंचायत.

- Advertisement -

 

नागझरी भागात उद्योग आणि घरगुती ग्राहकांना दोन वेगवेगळ्या फिडर मार्फत वीजपुरवठा केला जातो. विजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे वेळेत केली जातात, कार्यालयात आलेल्या तक्रारींवर तात्काळ काम केले जाते.

– नरेंद्र संगेपु, उपविभागीय अभियंता,महावितरण बोईसर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -