घरपालघरबोईसरवासियांसाठी खुशखबर ! प्रकल्प अखेर दृष्टीक्षेपात

बोईसरवासियांसाठी खुशखबर ! प्रकल्प अखेर दृष्टीक्षेपात

Subscribe

तात्काळ जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याचे आदेश दिले होते.

सचिन पाटील, बोईसर : बोईसर आणि परिसरात गेली अनेक वर्षे निर्माण झालेली घनकचर्‍याची समस्या अखेर सुटण्याची आशा निर्माण झाली आहे.१९ डिसेंबर रोजी पालघरचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संयुक्त बैठकीत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक जागा मिळविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.
बोईसर परिसरातील रोजच्या जमा होणार्‍या कचर्‍याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी तारापूर औद्योगिक परिसरात योग्य जागेचा शोध सुरू होता.यासाठी अनेक वेळा बैठकांचे देखील आयोजन करण्यात येऊनही प्रश्न सुटत नव्हता.राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच पालघर जि.प.चे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश निकम आणि सरावली गटाच्या जि.प.सदस्या पूर्णिमा धोडी यांनी बोईसर परिसरातील कचर्‍याची उग्र झालेली समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडताच त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित सर्व विभागांची संयुक्त बैठक घेण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार काल पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक ५ एकर जागेसाठी तारापूर औद्योगिक वसाहतीमधील ओएस-२७ आणि ओएस-६४ हे एमआयडीसीच्या अखत्यारीतील भूखंड तसेच बाजूची खासगी जागा संपादित करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्याबाबत सहमती झाली. त्याचबरोबर हा प्रकल्प संपूर्ण तयार होऊन कार्यान्वित होईपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी व येणारे अडथळे दूर करण्यासाठी एक समिती नेमण्याचे देखील निश्चित करण्यात आले.
बैठकीत संभाजीनगर जवळील वाळूंज येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करून तो यशस्वीपणे राबविणार्‍या महिंद्रा वेस्ट टू एनर्जी सोल्युशन लिमिटेड कंपनीच्या अधिकार्‍यानी विस्तृतपणे सादरीकरण करून ३० टनांचा प्रकल्प राबविण्यासाठी १८ ते २० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

बोईसरमध्ये घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जि.प.अध्यक्ष प्रकाश निकम, जगदीश धोडी, कुंदन संखे, जि.प.सदस्य पूर्णिमा धोडी,मंगेश भोईर, महेंद्र भोणे,करीश्मा उमतोल, पं.स.उपसभापती मिलिंद वडे, मुख्य कार्यकारी अधिकारी भानूदास पालवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंद्रशेखर जगताप, टिमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी,पापा ठाकूर, सिटीझन फोरमचे डॉ.सुभाष संखे,एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, उपअभियंता,संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालघर तालुक्यातील बोईसर शहर,तारापूर औद्योगिक वसाहत आणि लगतच्या सरावली, खैरापाडा, बेटेगाव, कोलवडे, कुंभवली, सालवड आणि पास्थळ या ७ ग्रामपंचायत क्षेत्रातील दैनंदिन कचर्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालला आहे.रोजचा जमा होणारा जवळपास २० टन ओला आणि सुका कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायत विभागाकडे आवश्यक सफाई कर्मचारी उपलब्ध नसल्याने अनेक दिवस हा कचरा सरावली येथील तात्पुरत्या कचरा भूमीवर त्याचप्रमाणे ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांवर, रस्त्यांच्या कडेला व खैरापाडा मैदानात उघड्यावर टाकण्यात येत आहे.उघड्यावर टाकण्यात येत असलेला हा कचरा कुजून परिसरात प्रचंड दुर्गंधी व रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -