घरपालघरबोईसरमध्ये मध्यरात्री आगडोंब, १५ गोदामे जळून खाक

बोईसरमध्ये मध्यरात्री आगडोंब, १५ गोदामे जळून खाक

Subscribe

या गोदामांच्या जवळच मोठ्या प्रमाणात रहिवाशी वस्ती असून भंगार सामानामुळे या ठिकाणी वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहेत.

बोईसर: अवधनगर भागात सोमवारी मध्यरात्री अचानक मोठा आगडोंब उसळला.रासायनिक पिंप आणि भंगार सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने जवळपास १५ गोदामे जळून खाक झाली.बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेगवान वारे वाहत असल्याने ही आग आजूबाजूच्या रहिवासी परिसरात पसरण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र तारापूर अग्निशमन दलाच्या व इतर अशा एकूण ६ बंबांनी पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी ७ वाजता आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. बोईसरमधील धोडीपूजा व अवधनगर भागात मोठ्या प्रमाणात भंगार सामानाची अनधिकृत गोदामे आहेत.या गोदामांमध्ये तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांतील घातक रसायनांची रिकामे पिंपे आणि इतर ज्वलनशील भंगार सामानाची विक्रीसाठी बेकायदेशीर साठवणूक केली जाते.या गोदामांच्या जवळच मोठ्या प्रमाणात रहिवाशी वस्ती असून भंगार सामानामुळे या ठिकाणी वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत आहेत.

सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास मोकळ्या जागेत ठेवलेल्या रासायनिक पिंपे आणि भंगार सामानाला अचानक आग लागली.रासायनिक व ज्वलनशील सामानामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण करून या आगीने जवळपास १५ गोदामे भस्मसात केली. आजूबाजूच्या रहीवासी वस्तीतील झोपेत असलेले नागरिक आग लागल्याचे समजताच जागे होऊन भीतीने घरांबाहेर आले.आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दलाचे २,पालघर नगरपरिषद १,तारापूर अणूउर्जा केंद्र १,वसई विरार मनपा १ आणि अदानी पॉवर १ अशा एकूण ६ बंबानी वेळेत घटनास्थळी पोचून पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर भडकलेली आग रहीवासी वस्तीपर्यंत पोहोचण्याच्या आधी विझवून आटोक्यात आणल्याने जीवितहानी व वित्तहानी होण्याचे पुढील संकट टळले. बोईसरच्या अवधनगर आणि धोडीपूजा विभागातील अनधिकृत भंगार गोदामांमुळे वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत असून या ठिकाणी रासायानिक पिंपे पाण्याच्या सहाय्याने साफ करून ते रसायनमिश्रीत पाणी बाजूच्या गटारांमुळे सोडण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या अनधिकृत भंगार गोदामांवर कारवाईसाठी पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा आजपर्यंत एकही कारवाई झालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -