घरपालघरआरोग्य विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ भरतीत गैरव्यवहार ?

आरोग्य विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ भरतीत गैरव्यवहार ?

Subscribe

याशिवाय याआधीच पालघर जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने अनुभव घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य न दिल्यामुळे त्यांच्याकडून ही नाराजी व्यक्त होत आहे.

पालघर: पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी झालेल्या सरळसेवे भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले जात आहेत. कौशल्य आधारित प्रशिक्षण नसतानाही केवळ पदवीच्या आधारे ही भरती केली जात असल्याने कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसह अनुभवी तंत्रज्ञांवर अन्याय झाला आहे. राज्य शासनाने आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी काढलेल्या सरळसेवा पदभरतीमध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या भरतीचा समावेश आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी डीएमएलटी असणे आवश्यक असताना राज्य शासनाने डीएमएलटीची अट काढून विज्ञान शाखेची पदवी असलेल्या उमेदवारांना या भरतीमध्ये प्राधान्य दिल्यामुळे डीएमएलटी केलेल्या उमेदवारांमध्ये खदखद आहे. याशिवाय याआधीच पालघर जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये कंत्राटी पद्धतीने अनुभव घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य न दिल्यामुळे त्यांच्याकडून ही नाराजी व्यक्त होत आहे.

तांत्रिकदृष्ट्या डीएमएलटीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून घेणे अपेक्षित असताना विज्ञान शाखेच्या पदवीधारकांना थेट संधी दिली गेली काहींना अनुभव नसताना त्यांनी परीक्षा उत्तीर्ण करून या पदासाठी बीएससी पदवीच्या जोरावर ते या पदासाठी पात्र झाले आहे. मात्र हे उमेदवार अनुभव नसताना आरोग्य संस्थांमध्ये काम कसे करतील याची कल्पना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने शासनाला दिल्याचे दिसून येत नाही. या आरोग्य संस्थांमध्ये या आधी स्थानिक उमेदवार काम करत आहेत त्यांना या नोकर भरती मध्ये प्राधान्य देण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेणे अपेक्षित असताना तसे केल्याचे दिसत नाही. याउलट सचिवांसोबत याबाबत तोंडी बोलणे झाले असल्याचे आरोग्य सभापती संदेश ढोणे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ३३ जण प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून पात्र ठरले असून ते जिल्हा परिषदेच्या विविध आरोग्य संस्थांमध्ये काम करणार आहेत. शिवाय या आरोग्य संस्थांमध्ये या आधी काम करणारे कंत्राटी तंत्रज्ञ यांना नोकरीतून बाहेर पडावे लागणार आहे. त्यामुळे २२ जण बेरोजगार होणार असल्याचे निश्चित आहे. याची दखल आरोग्य विभागाने घेतलेली नाही त्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग करतो तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

- Advertisement -

पदभरतीत घोटाळा असल्याचे निवेदन

आरोग्य विभागाच्या या पदभरतीमध्ये गैरप्रकार झाला असून या पदभरतीत स्थानिक अनुभवी उमेदवारांनी अर्ज भरूनही एकही उमेदवार पात्र ठरले नसल्याचे आश्चर्य जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला पदाधिकारी शुभांगी कुटे यांनी व्यक्त केला आहे. तसेच तंत्रज्ञासाठी डीएमएलटी हे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी किंवा उमेदवार यांना प्राधान्यक्रम न देता विज्ञान शाखेच्या पदवी विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना प्राधान्य दिले गेले आहे. हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले असून सरकारचे धोरण तरी नक्की काय आहे, असा प्रश्न त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया-१
जिल्हा परिषदेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून केलेल्या पदभरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा माझा आरोप आहे. डीएमएलटी प्रमाणपत्र अभ्यासक्रम न केलेल्या बिन अनुभवी उमेदवारांना या पदभरतीसाठी पात्र करणे अयोग्य आहे. त्यामुळे अनुभवी उमेदवारांवर बेरोजगारीची वेळ ओढवली आहे.
शुभांगी कुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य

प्रतिक्रिया-२
ही पदभरती थेट राज्य शासनाशी निगडित आहे. राज्य शासनाने दिलेले निकष व पदभरतीसाठी निवड केलेली एक यंत्रणा यांच्यामार्फत ही पूर्ण भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. यात गैरप्रकार नसून माजी सदस्यांनी निवेदनातून उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सरकारकडे पत्रव्यवहार केला जाईल.

– संदेश ढोणे, सभापती, आरोग्य व बांधकाम,जि.प.पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -