घरपालघरदोन अट्टल चोर गजाआड;घरफोडीचे पाच गुन्हे उघड

दोन अट्टल चोर गजाआड;घरफोडीचे पाच गुन्हे उघड

Subscribe

संध्याकाळच्या वेळेस बंद घरांच्या खिडकीचे ग्रील उचकटून कपाटातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार होण्यात चोर यशस्वी ठरत होते.

बोईसर: बोईसर परिसरातील बंद घरात चोरी करणार्‍या दोन अट्टल गुन्हेगारांना गजाआड करण्यात बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे.आतिष दत्ताराम साखरकर (वय-३६ वर्षे रा.फुलपाडा,विरार )आणि राहुल गिरीश राठोड,(वय-३८ वर्षे रा.वडकून,डहाणू) अशी या दोन अट्टल चोरांची नावे असून त्यांनी बोईसर परिसरात ५ ठिकाणी घरफोड्या करीत रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने असा लाखो रूपयांचा ऐवज चोरी केल्याचे कबूल केले आहे.
बोईसर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या दोन तीन महिन्यांपासून चोरी आणि घरफोडींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती.शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशी बरेच नागरिक हे कुटुंबासहीत सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जात असल्याचा फायदा उठवत चोरांनी धुमाकूळ घातला होता. संध्याकाळच्या वेळेस बंद घरांच्या खिडकीचे ग्रील उचकटून कपाटातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार होण्यात चोर यशस्वी ठरत होते.

बोईसर पोलीस स्टेशन येथे घरफोडी करून चोरीचे ५ गुन्हे दाखल झाले होते. परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले असता संशयीत चोरांचा चोरी करण्याचा एक सारखा पॅटर्न लक्षात आल्यावर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ,सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा व पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक शरद सुरळकर आणि विठ्ठल मनिकेरी यांच्यासोबत पो.ह.वा. विजय दुबळा,संतोष वाकचौरे,पोना संदीप सोनावणे,योगेश गावीत सुरेश दुसाने,देवेन्द्र पाटील,धिरज साळुंखे,मच्छिंद्र घुगे आणि मयूर पाटील यांच्या पथकाने शनिवार आणि रविवारी संध्याकाळच्या वेळेस गस्त सुरू करून आरोपींचा शोध सुरू केला होता. ५ फेब्रुवारीला बोईसर रेल्वे स्थानक परिसरात पोलीस अंमलदार संतोष वाकचौरे हे साध्या वेशात गस्त घालीत असताना सीसीटीव्ही फुटेजमधील दोन्ही संशयीत आरोपी डीजी-१ या दुकानाजवळ फिरत असल्याचे लक्षात आल्यावर वाकचौरे यांनी त्यांना चौकशीसाठी थांबण्याचा इशारा करताच चोरांनी उलट पोलिसावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरा चोर झटापटीचा फायदा घेत रेल्वे स्टेशनकडे पळाला.यावेळी आजूबाजूच्या गर्दीने फक्त बघ्याची भूमिका घेतली. मात्र संतोष वाकचौरे यांनी एकट्याने धाडस करीत शिताफीने चोराच्या मुसक्या आवळल्या .तर लोकलने पळून गेलेल्या दुसर्‍या चोराला पालघर स्टेशन येथे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.या चोरांकडून ५ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींची कसून चौकशी करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -