घररायगडमाथेरान अश्वपालकांचा जल्लोष

माथेरान अश्वपालकांचा जल्लोष

Subscribe

दसरादिनीच्या अश्व रॅलीस मोठा प्रतिसाद

 

माथेरान
प्रदूषण मुक्त पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये वाहनबंदी असल्याने ये-जा करण्यासाठी एकमेव व्यवस्था म्हणून अश्व वाहनातूनच माथेरान फिरावे लागते.दसरा हा अश्वचालकांचा महत्वाचा सण असून या दिवसापासून त्यांच्या व्यावसायिक वर्षाला सुरुवात होत असते. त्यामुळे सालाबादप्रमाणे बुधवारी अश्वचालकांकडून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करतानाच भव्य अश्व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजता सर्व घोड्यांना सजवून भक्तीभावाने त्यांची विधिवत पूजा करून दोन रांगांमध्ये शिस्तबध्दपणे सर्व घोड्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.माथेरानच्या मुख्य विभागातून सजवलेले घोडे फिरवून श्रीराम चौक येथे वाद्यांच्या तालावर घोडे नाचविले गेले.घोड्यांवर केलेली आकर्षक सजावट पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होते.स्थानिक अश्वपाल संघटना व मूळवासीय अश्वपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या मिरवणुकीचे आयोजन केले होते.

- Advertisement -

माजी अश्वपालकांचा सन्मान
घोडा व्यवसाय करणार्‍या युवकांच्या ‘फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप’ संघटनेकडून घोड्यावर उदरनिर्वाह करून प्रतिकूल परिस्थितीत आपल्या प्रपंचाचा गाडा समर्थपणे पेलून अश्वपाल संघटनेला एक वेगळी दिशा दिली, अशा माजी ज्येष्ठ अश्वचालकांचा सन्मान श्रीराम चौक येथे मंचावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आला. हैदर महाबळे,नरेंद्र म्हाम्हणकर,समीर महापुळे,निलेश कदम,देवेंद्र मोरे,निलेश ढेबे, संतोश आखाडे, अकीब महापुळे,विशाल ढेबे आदी युवकांनी ६७ जेष्ठ नागरिक,डॉक्टर,घोडा सुस्थित ठेवणार्‍या घोडेवाल्यांचा यथोचित सन्मान केला

कार्यक्रमाला गालबोट
वाद्यांच्या तालावर घोडे नाचवत असताना अचानक काही अश्वचालकांमध्ये एकमेकांना पाय लागला म्हणून बाचाबाची सुरू झाली.त्या भांडणाचे पर्यवसान भर गर्दीत हाणामारीत झाले.अश्वपाल संघटनेचे काही कार्यकर्ते आणि मुळवासीय संघटनेचे काही कार्यकर्ते यांच्यात ही हाणामारी झाली.त्यावेळेस तिथे हजर असलेले पोलीस शिपाई दामोदर खतेले यांनी एकट्याने दोन्ही गट बाजूला करून शांतता प्रस्थापित केली.पोलिसांकडून दोन्ही गटावर गुन्हे दाखल केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -