घररायगडचौकनजीक ब्लास्टिंग दुर्घटनेत मायलेकाचा मृत्यू ७ जण जखमी

चौकनजीक ब्लास्टिंग दुर्घटनेत मायलेकाचा मृत्यू ७ जण जखमी

Subscribe

पनवेल-कर्जत रेल्वेच्या दुसर्‍या मार्गादरम्यान टनेलचे खडक फोडण्यासाठी केलेल्या ब्लास्टिंगमुळे शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. ब्लास्टिंगमुळे उंच उडालेल्या दगडांचा मार बसून चौक-कर्जत रस्त्यावरून मोटरसायकलने प्रवास करणार्‍या देवका महादू बडेकर (६५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा सचिन बडेेकर (४५) यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. याच मार्गावरून जाणारे ७ बाईकस्वारही गंभीररित्या जखमी झाले आहेत. ब्लास्टिंगमुळे रेल्वे ट्रॅकच्या वरच्या बाजूला असलेला एका डम्परनेही पेट घेतला.

हे ब्लास्टिंग कर्जत-चौक रस्त्यापासून साधारण २० मीटर अंतरावर करण्यात आले असून ते करताना या परिसराची कोणतीच काळजी न घेता आणि या मार्गावरील वाहतूक विशिष्ट अंतरावर न थांबवता ब्लास्टिंग केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होत दोघांना जीव गमवावा लागला आहे. जखमींना नजीकच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारांनी ब्लास्टिंग करण्यापूर्वी निष्काळजीपणा केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. ब्लास्टिंगमुळे उंच उडालेले दगड रस्त्याच्या कडेला असलेल्या फुले, भाजी आणि चिकन आदी दुकानांत उडून हे दुकानदारदेखील जखमी झाले आहेत. त्यांच्या दुकानांचेही नुकसान झाले आहे.

- Advertisement -

सदर घटनेमुळे कर्जत आणि परिसरातील जनतेत कमालीचा संताप व्यक्त होत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, अपघातग्रस्त टीमची रुग्णवाहिका, मंडळ अधिकारी किरण पाटील, समाजसेवक श्यामभाई साळवी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना शांत होण्याचे आवाहन केले, मात्र आंदोलनकर्ते रस्त्यावरून उठण्यास तयार नव्हते. ही संध्याकाळची वेळ असल्याने घरी जाणार्‍या कामगार आणि विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली.

गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील जनता हे ब्लास्टिंग बंद करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी विनंती करीत आहे. तरीही रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -