घरसंपादकीयओपेडथर्टी फर्स्टच्या जल्लोषाला पर्यटकांच्या हुल्लडबाजीचे ग्रहण!

थर्टी फर्स्टच्या जल्लोषाला पर्यटकांच्या हुल्लडबाजीचे ग्रहण!

Subscribe

दळणवळणाची सहज सुलभ साधने, खासगी वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांचे जाळे आदी कारणांमुळे शहरी पर्यटक कोकणात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. कोकणात पर्यटकांची संख्या वाढत असताना त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा व्यवस्थित पुरविण्यात आलेल्या नाहीत. असे असताना ३१ डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या नावाखाली होणारी गर्दी स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने असह्य ठरते. यातून काही पर्यटकांची मुजोरी सुरू होते. यात कुटुंबवत्सल पर्यटक पुरुष-महिलांची मोठीच कुचंबणा होते. अनेकदा पर्यटकांमध्येच तू तू मै मै होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. काही पर्यटक स्थानिक ग्रामस्थांशीच पंगा घेतात.

३१ डिसेंबर…गेल्या काही वर्षांपासून अनेकांना हवाहवासा वाटणारा दिवस! ‘थर्टी फर्स्ट’ असे दोन शब्द उच्चारले म्हणजे ते मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबरची ३१ तारीख नव्हे, तर ३१ डिसेंबरच हे ठरून गेलेले आहे. ३१ तारखेला रात्री जल्लोष करायचा आणि मध्यरात्री १२ वाजल्यानंतर नवीन वर्षाचे स्वागत करायचे, असे खरे तर त्याचे स्वरुप आणि त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. आपल्याकडे काहीजण १ जानेवारीला, तर काहीजण चैत्र पाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात करतात. तरीही १ जानेवारी ही तारीख नवीन वर्षाची सुरुवात हे ग्रेगरिअन कॅलेंडरप्रमाणे नक्की झालेले आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत ही रित तयार होऊन गेली आहे, मात्र अलिकडे थर्टी फर्स्टच्या नावाखाली ‘काहीही’ असेच काहीसे चालले आहे.

या दिवशी मुंबईतील चौपाट्या तुडुंब भरणे हे काही वर्षांपर्यंत वाटणारे अप्रुप आता वाटेनासे झाले आहे. कारण उर्वरित कोकणातील समुद्र किनार्‍यांवरही पर्यटकांची प्रचंड, म्हणजे मुंगी शिरायलाही वाव नसतो, अशी गर्दी होऊ लागली आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर बाहेरूनही पर्यटक दाखल होत असतात. या पर्यटकांच्या येण्यावरही कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु एकाच वेळी होणारी गर्दी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची डोकेदुखी ठरू लागली आहे. पोलीस लक्ष ठेवणार तरी कुठे-कुठे, अशी त्या दिवसाची परिस्थिती असते. पोलीस यंत्रणा अपुरी पडते म्हणून काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यातून स्थानिकांचीही डोकेदुखी वाढत आहे. होणार्‍या गर्दीतून बर्‍याचदा बेताल वर्तन होत असल्याने, ताळतंत्र सोडले जात असल्याने अशा पद्धतीने वागल्यानंतरच थर्टी फर्स्ट साजरा होतो का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

दळणवळणाची सहज सुलभ साधने, खासगी वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांचे जाळे आदी कारणांमुळे शहरी पर्यटक कोकणात मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. कोकणात पर्यटकांची संख्या वाढत असताना त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा धडपणे पुरविण्यात आलेल्या नाहीत. असे असताना ३१ डिसेंबर अर्थात थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या नावाखाली होणारी गर्दी स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने असह्य ठरते. यातून काही पर्यटकांची मुजोरी सुरू होते. यात कुटुंबवत्सल पर्यटक पुरुष-महिलांची मोठीच कुचंबणा होते. अनेकदा पर्यटकांमध्येच तू तू मै मै होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत जाते, तर काही वेळेला अतिउत्साही पर्यटक स्थानिक ग्रामस्थांशीच पंगा घेण्याचे भलते सलते धाडस करतात.

फाजील उत्साही पर्यटकांना मग स्थानिकांकडून ‘प्रसाद’ही दिला जातो. पर्यटकांचा उत्साह आता समुद्र किनार्‍यांकडून फार्म हाऊस, रिसॉर्ट, सेकंड होम असलेल्या प्रशस्त बंगल्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे, पण तेथील उत्साह जेव्हा शिगेला पोहचतो तेव्हा आसपासच्या ग्रामस्थांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो, नव्हे अशा प्रकारच्या तक्रारींत वाढही होऊ लागली आहे. आडमार्गाला रेव्ह पार्ट्याही रंगत असल्याची खुली चर्चा आहे. तेथील कर्णकर्कश, कानठळ्या बसविणारा डीजेचा आवाज, डोळे दिपवून टाकणारी रोषणाई, मग एक एक ‘घोटा’सोबत वाढणार्‍या उत्साहामुळे सुरू होणारा बेताल धांगडधिंगा स्थानिक गावकर्‍यांना नकोसा झाला आहे. येणारे पर्यटक असे ताळतंत्र सोडणार असतील तर पर्यटनवाढीचे तुणतुणे वाजविण्यात येतात ते याचसाठी का, असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

- Advertisement -

दोन वर्षे कोरोनाने सर्वांनाच कुलुपबंद करून ठेवले होते. आता सर्वच निर्बंध हटविण्यात आल्याने यंदाचा थर्टी फर्स्टचा जल्लोष मोठ्या प्रमाणात होणार हे सांगण्यासाठी कुणा तज्ज्ञाची गरज नाही. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्‍या पोलिसांची वेगवेगळ्या कारणांमुळे अगोदरच दमछाक झालेली असताना नाताळपासून ते १ जानेवारीपर्यंतच्या दिवसांची त्यात भर पडली आहे. एखादी अतिमहत्त्वाची व्यक्ती येते तेव्हा जसा बंदोबस्त ठेवावा लागतो तसा बंदोबस्त जवळपास आठवडाभर ठेवावा लागतो. तपासणी नाके सज्ज ठेवले जातात. दारू पिऊन वाहन चालविणे हा अपराध असला तरी त्यावर होणारी कारवाई अगदीच थातूर मातूर वाटावी अशी असल्याने दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांची संख्या काही कमी झालेली नाही आणि शेवटी पोलीस तरी किती ठिकाणी वाहनचालकांना तोंडाचा वास द्यायला लावणार आहेत? कोरोनानंतर तर ब्रेथ अ‍ॅनालायझर वापरणेही बंद करण्यात आले आहे. थर्टी फर्स्ट साजरा होत असताना त्या रात्री वाहने भन्नाट वेगाने चालविण्यात येत असल्याचा अनुभव अनेकजण सांगतील. शहाण्या माणसाने पोलीस ठाणे आणि न्यायालयाची पायरी चढू नये असे म्हटले जाते, तसे आता थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहाण्या माणसाने त्या दिवशी वाहनाचा प्रवास करू नये, असा नवा वाक्प्रचार भविष्यात रूढ झाला तर आश्चर्य वाटणार नाही.

पर्यटकांना थर्टी फर्स्टचे वेध लागलेले असताना कोकणातील पोलीस अ‍ॅलर्ट मोडवर आल्याचे वृत्त आहे. दारू आणि थर्टी फर्स्ट यांचे इतके सख्य झालंय की दारूशिवाय ३१ डिसेंबरची रात्र ही कल्पनाच अनेकांना सहन होण्या पलिकडील आहे. आता दारूला उद्यापासून स्पर्श करणार नाही, अशा आणाभाका घेणारे झालेला हँगओव्हर उतरविण्यासाठी दुसर्‍या दिवशी ‘उतारा’ घेतानाचे गमतीशीर दृश्य कित्येकांच्या ओळखीचे झाले आहे. पोलिसांना काळजी आहे ती असली आणि नकली दारूप्रमाणे पार्ट्यांच्या नावाखाली अमली पदार्थांच्या संभाव्य तस्करीची! तरुणाईमध्ये नशिल्या किंवा अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले आहे. त्यासाठी हजारो, लाखो रुपये मोजणारे महाभाग आहेत. थर्टी फर्स्टच्या नावाखाली अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांचे जाळे पद्धतशीरपणे पसरलेले असल्याने पोलीस किंवा अन्य संबंधित यंत्रणा या तस्करांना किंवा त्यांच्या हस्तकांना कसे रोखणार, हा सवाल आहे. आडमार्गाला चालणार्‍या पार्ट्यांतून बर्‍याचशा अनैतिक गोष्टी घडत असतात हे लपून राहिलेले नाही. पोलीस किंवा इतर यंत्रणांनी अशा पार्ट्यांतून अमली पदार्थ हस्तगत केल्याची उदाहरणे आहेत. थर्टी फर्स्टच्या नावाखाली कोकणातील गर्दी होणार्‍या ठिकाणी अमली पदार्थांची आवक सहजपणे होणार असेल तर ती बाब गंभीरपणे घ्यावी लागणार आहे. अमली पदार्थांची तस्करी मोडून काढण्यात सरकारी यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही, किंबहुना अमली पदार्थांची तस्करी समुद्रामार्गे होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले दिसत आहे. स्थानिकांना याची कुणकूण जरी लागली तरी त्यांनी याची माहिती पोलिसांना सत्वर देण्याची गरज आहे. कारण पर्यटनाच्या नावाखाली हे विष शांतताप्रिय कोकणात नको.

थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या नावाखाली शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण (सरसकट नव्हेत) दारूचे ग्लास हाती घेत असल्याचे धोकादायक वास्तव समोर येत आहे. ही मुले संध्याकाळपासून कुठेतरी आडमार्गाला बसून सरत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस साजरा (!) करतात. लहान मुलेही फरसाण, चिवडा आणि शीतपेयांचे ग्लास समोर ठेवून जल्लोष करू लागले आहेत. बर्‍याचदा असेही लक्षात येते की या लहान मुलांना यासाठी घरच्यांकडूनच प्रोत्साहन मिळते. थर्टी फर्स्टच्या नावाखाली कुठे नेऊन ठेवलीय भावी पिढी, असे म्हणायची वेळ आली आहे. काही तरुण आध्यात्मिक मार्गातही त्या दिवशी स्वतःला गुंतवून ठेवत असल्याचे सुखद चित्र पाहावयास मिळते, मात्र ही संख्या जल्लोषींच्या तुलनेत अगदीच कमी आहे. पर्यटकांनी थर्टी फर्स्टसाठी यावे आणि शिस्तीत मनमुराद आनंद घ्यावा, असे कुणाला वाटत असले तरी ते शक्य होत नाही. कारण जल्लोषाचा ‘निर्देशांक’ इतका टोकाला जातो की त्याची तुलना प्रत्येक मागील वर्षाशी होऊ लागली आहे. अनेकदा असे दिसून येते की तरुणांची टोळकी रस्त्याच्या कडेला जल्लोष करतात. इतकेच नव्हे तर धरणांचा परिसरही याकरिता निवडला जात आहे. गावाबाहेर असलेल्या शाळांची खुली मैदानेही ‘चीअर्स’साठी सोयीची ठरू लागली आहेत. हाताबाहेर जात असलेला हा अघोरी वाटावा असा जल्लोष कोण रोखणार, याचे उत्तर आज तरी कुणाकडे असेल असे वाटत नाही.

फाजील उत्साह वेळीच रोखला गेला नाही की काय होते, ते थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पाहायला मिळते. जल्लोष साजरा करण्यासाठी येणारे सर्वच धांगडधिंगा करण्याच्या मन:स्थितीत असतात अशातला भाग नाही, पण सुक्याबरोबर ओलेही जळते, तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद दिवस असा येईल की सरत्या वर्षाला कसा निरोप द्यायचा आणि नव्या वर्षाचे कसे स्वागत करायचे, याचे प्रबोधन वर्ग जागोजागी घ्यावे लागतील. परदेशातही थर्टी फर्स्टचा जल्लोष आपण दूरचित्रवाहिन्यांवर पाहतो, पण या जल्लोषात उन्माद क्वचितच कुठे तरी दिसतो. परकियांकडून आपण थर्टी फर्स्टचे वाण घेतलेय खरे, पण त्यात येथे अनेकदा उन्मादाचा कळस होताना दिसतो. यामुळेच कुटुंबवत्सल माणसे घरात टीव्हीसमोर बसून थर्टी फर्स्ट साजरा करताना आढळून येतात. नको रे बाबा ती विकतची डोकेदुखी, असे म्हणणारे किती तरी भेटतील!
नवीन वर्षाची पहाट आणि त्यानंतरचा पूर्ण दिवस वाहतुकीसाठी महत्वाचा असतो. कारण वाहनांचा वेग भन्नाट वाढतो.

आदली रात्र मनमुराद साजरी करणारे हौशे, नवशे वाहन कशाही पद्धतीने चालवितात. यामुळे अपघाती घटना घडण्याची शक्यता अधिक असते. नियंत्रित वेग हे दोन शब्द अनेक चालकांना त्या दिवशी नकोसे वाटतात. थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष साजरा करताना कायदा आणि सुव्यवस्थाच धाब्यावर बसवली जाणार असेल किंवा तिला आव्हान मिळणार असेल, तर वेळीच कठोर पावले उचलावी लागतील. बेताल पर्यटकांमुळे पर्यटन वृद्धीला हातभार लागण्याऐवजी नुकसानच होणार आहे. अशांना आवरले की इतर पर्यटक मोकळेपणाने आणि मनसोक्त आनंद घेण्यासाठी कोकणात येतील. त्यांच्यामुळेच पर्यटनाला चालना मिळणार आहे. एक दिवसाने काय होतंय, असे म्हणून चालणार नाही. थर्टी फर्स्टच्या नावाखाली दारू आणि नशिले पदार्थ हातात हात घालून नांदणार असतील तर ती तरुणाईसाठी धोक्याची घंटा ठरेल. अति तेथे माती होऊन न देणेच सर्वांच्या हिताचे आहे. दरम्यान, हा लेख संपवताना चीनमध्ये कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घातल्याचे वृत्त आले आहे. भारत सरकारही सावध झाले आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी जमणार्‍या अफाट गर्दीवर काही नियंत्रण येणार का, हा आता म्हटलं तर कळीचा, म्हटलं तर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धम्माल, मस्तीच्या मूडमध्ये असणार्‍या अनेकांच्या पोटात गोळा आला असल्यास नवल वाटू नये!

थर्टी फर्स्टच्या जल्लोषाला पर्यटकांच्या हुल्लडबाजीचे ग्रहण!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -