घररायगडपाण्यासाठी पेण खारेपाटातील महिलांचा मोर्चा, प्रांत कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण

पाण्यासाठी पेण खारेपाटातील महिलांचा मोर्चा, प्रांत कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण

Subscribe

वाशी खारेपाट भाग हा गेल्या २० वर्षांपासून पाण्यापासून वंचित आहे. उन्हाळा सुरु होत नाही तोच या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती निर्माण होत आहे. परंतु कुठलाच राजकीय लोकप्रतिनिधी हा महत्वाचा प्रश्न सोडवू शकलेला नाही.

पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी पेणमधील मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरूवारी शहरात महिलांनी मोर्चा काढला. त्यानंतर प्रांत कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

वाशी खारेपाट भाग हा गेल्या २० वर्षांपासून पाण्यापासून वंचित आहे. उन्हाळा सुरु होत नाही तोच या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून हीच परिस्थिती निर्माण होत आहे. परंतु कुठलाच राजकीय लोकप्रतिनिधी हा महत्वाचा प्रश्न सोडवू शकलेला नाही.सध्या वाशी, शिर्की खारेपाट विभागात काही ठिकाणी आठवड्यातून एकदा तर काही ठिकाणी तीन दिवसातून पाणी येत आहे.मात्र, हे पाणी गढूळ व अशुद्ध आहे. येथील प्रलंबित पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा इतर मागण्यांसाठी पेण शहरातून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संतप्त महिलानीं जनमोर्चा काढला. धरण उशाशी, कोरड आमच्या घशाशी, खारेपाटातील जनतेला पाणी मिळालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, या घोषणांनी संपूर्ण पेण शहर दणाणून निघाले.

- Advertisement -

निधी मंजूर झाला आहे, ठेकेदार बदलला आहे, पावसाळ्याआधी होईल, फेब्रुवारी महिन्याच्या आत होईल अशी एक ना अनेक कारणे गेली वीस वर्षे खारेपाट विभागातील नागरिक ऐकत आहेत. पाण्यासाठी याआधी इतर संघटना, लोकप्रतिनिधी यांनीही अनेक प्रयत्न केले असल्याने खारेपाटाला निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, पाणी जनतेच्या दारापर्यंत पोहोचले नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल असे मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या अध्यक्षा मोहिनी गोरे, सचिव नंदा म्हात्र यांनी सांगितले. उपोषणात व मोर्चात खारेपाट विकास संकल्प समिती, ठाकूर बेडी महिला बचत गट, वढाव पंचक्रोशी महिला बचत गट, कासू नवेघर महिला गट, बहुजन वंचित महिला आघाडी, शब्दभेदी, शिवतेज, बेरोजगार सामाजिक संघटना तसेच भारतीय महिला फेडरेशन महाराष्ट्र या संघटनांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे काम जुलै 2022 ऐवजी एप्रिल 2022 पर्यंत पूर्ण करावे, हेटवणे कालव्याच्या कामाचे रिटेंडरिंग करावे, वाशी खारेपाट भागात तीन दिवसांत टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा, वाशी भागात जाणार्‍या व इतर ठिकाणी जाणार्‍या सिडकोच्या पाईपलाईनवरील अनधिकृत नळ कनेक्शन तातडीने काढावेत, गढूळ पाण्याचे नमुने घेऊन त्याची फॉरेन्सिक तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा आदी मागण्यांचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना देण्यात आले. यावेळी पेणच्या तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी गडरी, जीवन प्राधिकरण, सिडको तसेच पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -