घरक्रीडासराव सामन्यात रहाणे, पुजारावर नजर

सराव सामन्यात रहाणे, पुजारावर नजर

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामन्याला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात कसोटी संघातील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यावर नजर असणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध होणार्‍या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी या सामन्यात खेळपट्टीवर जास्तीतजास्त वेळ घालवण्याचे या दोघांचेही लक्ष्य असेल. त्याचप्रमाणे एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराहलाही गोलंदाजीचा सराव करण्याची या सामन्यात चांगली संधी आहे.

भारतीय संघाने टी-२० आणि एकदिवसीय मालिका अगदी सहजतेने जिंकली. एकदिवसीय मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने दोन शतके झळकावत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, तिसर्‍या सामन्यात त्याच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो या सराव सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. वेस्ट इंडिजविरुद्धचे सामने हे आयसीसी जागतिक कसोटी स्पर्धेतील भारताचे पहिले २ सामने असणार आहेत.

- Advertisement -

चेतेश्वर पुजारा हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील ४ सामन्यांत ३ शतके लगावली होती. जानेवारीमध्ये झालेल्या या मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याने १९३ धावांची खेळी केली. त्यानंतर पुजाराने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तर रणजी करंडकतील अखेरचा सामना त्याने फेब्रुवारीमध्ये खेळला होता. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड इलेव्हनविरुद्ध तो खेळपट्टीवर बराच वेळ घालवण्याचा प्रयत्न करेल.

कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेला मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. त्याने अखेरचे कसोटी शतक ऑगस्ट २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध केले होते. त्यामुळे त्याच्या कसोटी संघातील स्थानाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मालिकेआधी फॉर्मात येण्यासाठी तो कौंटी क्रिकेट खेळला, पण तिथे त्याने ७ सामन्यांत २४ च्या सरासरीने केवळ ३०७ धावा केल्या. मुंबईकर रहाणेसाठी विंडीजविरुद्धची ही मालिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे अगदी सराव सामन्यापासूनच दमदार कामगिरी करण्याचे त्याचे लक्ष्य असेल.

- Advertisement -

तसेच एकदिवसीय मालिकेत निराशाजनक कामगिरी करणार्‍या रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांना धावांची गरज आहे. कसोटी संघात मयांक अगरवालने आपले स्थान पक्के केले आहे. मात्र, पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत त्याचा सलामीचा साथी कोण असणार हे अजून निश्चित नाही. दुसरा सलामीवीर म्हणून लोकेश राहुल आणि हनुमा विहारी यांच्यात चढाओढ आहे. गोलंदाजीत उमेश यादव आणि इशांत शर्मा संघ व्यवस्थापनाला प्रभावित करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील.

भारतीय कसोटी संघ :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयांक अगरवाल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, हनुमा विहारी, उमेश यादव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -