घरक्रीडाभारतीय महिलांची इंग्लंडवर मात

भारतीय महिलांची इंग्लंडवर मात

Subscribe

मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्स, कर्णधार मिताली राजची चांगली फलंदाजी आणि एकता बिश्तच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड महिला संघाचा ६६ धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना यांनी डावाची चांगली सुरुवात केली. त्यांनी १५ षटकांत ६९ धावांची भागीदारी केल्यानंतर १६ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जॉर्जिया एल्विसने मानधनाला २४ धावांवर बाद केले. यानंतर दीप्ती शर्मा फारकाळ खेळपट्टीवर टिकाव धरू शकली नाही. ती ७ धावा करून बाद झाली. संयमाने खेळणार्‍या जेमिमा ४८ धावांवर सोफी एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर बाद झाली. हर्लीन देओल (२) आणि मोना मेश्राम (०) या दोघीही झटपट बाद झाल्याने भारताची ५ बाद ९५ अशी अवस्था झाली. यानंतर कर्णधार मिताली राज (४४), तानिया भाटिया (२५) आणि झुलन गोस्वामी (३०) यांनी चांगली फलंदाजी केली. पण, इंग्लंडच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केल्यामुळे भारताचा डाव २०२ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून जॉर्जिया एल्विस, नॅटली स्किव्हर आणि सोफी एक्लेस्टोन यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

- Advertisement -

२०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १३६ धावांतच आटोपला. कर्णधार हेथर नाईट (३९) आणि स्किव्हर (४४) या दोघी चांगल्या खेळत असताना इंग्लंडची ३ बाद १११ अशी धावसंख्या होती. मात्र, यानंतर एकता बिश्तने इंग्लंडच्या ४ फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे त्यांनी पुढील ७ विकेट अवघ्या २५ धावांत गमावल्या आणि हा सामना ६६ धावांनी गमावला. शिखा पांडे आणि दीप्ती शर्माने २-२ विकेट घेत बिश्तला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक –

- Advertisement -

भारत : ४९.४ षटकांत सर्वबाद २०२ (जेमिमा रॉड्रिग्स ४८, मिताली राज ४४; सोफी एक्लेस्टोन २/२७, नॅटली स्किव्हर २/२९, जॉर्जिया एल्विस २/४५) विजयी वि. इंग्लंड : ४१ षटकांत सर्वबाद १३६ (नॅटली स्किव्हर ४४, हेथर नाईट ३९; एकता बिश्त ४/२५, शिखा पांडे २/२१, दीप्ती शर्मा २/३३).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -