घरक्रीडासुन्या सुन्या मैफिलीत...दोहा !

सुन्या सुन्या मैफिलीत…दोहा !

Subscribe

वाळवंटात अ‍ॅथलेटिक्सचं रोपटं उगवेल का? वाळवंटातील उष्म्यात ते अ‍ॅथलेटिक्सचं रोपटं सुकणार तर नाही ना?, अ‍ॅथलेटिक्स संस्कृतीविषयी कोपरखळ्या मारणारे हेच प्रश्न सध्या दोहात, जगभरातले अ‍ॅथलिट्स विचारत आहेत! ज्या वाळवंटात, रणरणत्या उन्हात, जिथे साधं चालणं मुष्कील, तिथे अ‍ॅथलेटिक्सचं रोपटं कुणी मुद्दाम, अट्टाहासापोटी लावलं तर ते टिकेल का? असा प्रश्न या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय! एक तर क्रीडा शौकिनांना ‘दोहा’ हे लांबवरचंच ठिकाण आहे.

शिवाय आता अ‍ॅथलिट्स म्हणू लागलेत की, दोहात अ‍ॅथलेटिक्सची संस्कृती कुठाय? बरेच जण आता कुजबुजू लागले आहेत की, कतारला दोहात जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती भरावयाची संधीच कशी मिळाली?, दोहाविषयी भारंभार प्रश्न विचारले जाण्याचं कारण, जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींमध्ये अ‍ॅथलिट्सनी पाहिलेलं दोहाचं रिकामं स्टेडियम. खलिफा स्टेडियमकडे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यतींदरम्यान उत्तेजक सेवनाचं निघालेलं नवं लचांड. शर्यतीदरम्यान कोसळल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागलेली अ‍ॅथलिट. एक ना दोन. शेकडो कहाण्यांनी दोहा खदखदतंय!

- Advertisement -

रोजच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करणार्‍या कतारी पदाधिकार्‍यांना भर उकाड्यातदेखील थंडीने कापरं भरल्यागत झालंय! तर तिकडे दुसरीकडे अ‍ॅथलिट्स म्हणतात, या रिकाम्या दिसणार्‍या स्टेडियम्सनी आमची झोपच उडवलीय! चिअर अप करायला कोणी नाही. जिंकलो तर टाळ्या वाजवायला कोणी नाही. स्पर्धकांचा लवाजमा जेवढा हजर असतो तेवढेच आणि थोडेसे इतर प्रेक्षक, प्रतिसाद द्यायला हजर असतात. अन्यथा स्टेडियममध्ये कुठे प्रेक्षकच दिसत नाहीत. अ‍ॅथलिट्सचा साधा प्रश्न आहे, जर का एवढी हलाखीची परिस्थिती या वाळवंटी भागात आहे तर मग कतारला जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती भरवायची संधीच का दिली? अ‍ॅथलिट्स २०१७ साली लंडन येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती विसरलेले नाहीत. त्यावेळी ७०,००० अ‍ॅथलेटिक्स शौकिनांनी युसेन बोल्ट, मो फराह या सुपरस्टार अ‍ॅथलिट्सच्या कामगिर्‍यांनी स्टेडियम दणाणून टाकलं होतं! यावेळी अ‍ॅथलेटिक्स महासंघाची डोकेदुखी अशी की लंडनमध्ये, अ‍ॅथलेटिक्समधून निवृत्ती घेतल्यामुळे, बोल्ट आणि मो फराहसारखे सुपरस्टार अ‍ॅथलिट्स दोहा येथील स्पर्धाशर्यतींत नाहीत! त्यामुळे जागतिक पटलावर ‘ग्लॅमरस’ म्हणावं असं व्यक्तिमत्व नसल्याने सध्याचे अ‍ॅथलिट्स प्रेक्षकांची गर्दी स्टेडियममध्ये खेचून आणू शकत नाहीयेत! आयोजकांनी सांगितलं ‘कतार’ सध्या राजकारणाचा बळी ठरलंय.

अनेक आखाती देशांच्या बहिष्कारामुळं कतारचा हात अगोदरच वाळूत रुतला आहे. २०१४ मध्ये जेव्हा दोहाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, तेव्हा राजकीय परिस्थिती हाताबाहेर गेलेली नव्हती! उलट सध्या विरोधात असलेल्या आखाती देशांचं कतारबरोबर चांगलंच मेतकूट जमलं होतं. २०१४ साली आखातात जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती होणार म्हणून काय-काय करामती केल्या गेल्या त्यादेखील आता हळुहळू बाहेर येताहेत. कतारी नागरिकांचं वेगळच म्हणणं आहे. ते म्हणतात, जगभरातल्या प्रेक्षकांच्या सोईचं असं वेळापत्रक आखलं गेलं. सगळ्या अंतिम शर्यती अगदी मध्यरात्री ठेवल्या गेल्या. साहजिकच नोकरी-धंद्याला जाणारा माणूस काम टाकून रात्री १२ वाजता, रस्त्यावर कसा उभा राहणार टाळ्या वाजवायला?

- Advertisement -

या सर्व गोष्टींशिवाय हॉलंडची सिफान हसन काही वेगळंच बोलते आहे. सिफान जी मूळ इथिओपियाची आहे, ती १५ वर्षांची असताना स्थलांतरित म्हणून नेदरलँडला आली. मो फराह, केनियन अ‍ॅथलिट्स आणि इथिओपिअन अ‍ॅथलिट्स यांच्याबरोबर सराव करू लागली. त्या सर्व चमूचे कोच प्रशिक्षक अल्बर्टो सालाझार होते. त्यांचे एक-एक अ‍ॅथलिट उत्तेजक सेवनात अडकू लागल्यावर, सालाझारच्या कोंडाळ्यातून धूर्तपणे मो फराह बाजूला झाला. मग सिफान बाजूला झाली. आता सिफान म्हणते, प्रशिक्षक सालाझारचा वाद (सालाझार यांना अ‍ॅथलिट्सना उत्तेजक सेवन दिल्या प्रकरणात ४ वर्षांसाठी बाद केलं आहे. कुठल्याही स्पर्धाशर्यतींना त्यांना उपस्थितही राहता येणार नाहीये!) नेमका आत्ताच उकरून काढण्यात कुणी नेमका डाव साधतय का? सिफान हसन परवाच महिलांची १०००० मीटर्सची शर्यत जिंकली आणि आता १५०० मीटर्सची शर्यत जिंकायची तिची इच्छा आहे.

असं करणारी आजवरच्या इतिहासातली ती एकमेव असणार आहे. त्यानिमित्ताने नेदरलँड या आपल्या नव्या देशाला ती दोन सुवर्ण बहाल करू इच्छित आहे. परंतु, हे सालाझार प्रकरण नव्याने उकरून काढून, संशयाची सुई तिच्या पाठी लावून ठेवून तिला उत्तेजक प्रकरणात कुणी गुंतवू पाहत आहे असं सिफान हसनचं म्हणणं आहे.

दोहात चाललेल्या घडामोडींविषयी जागतिक विक्रमवीर गॅब्रसेलासी जास्त गंभीरपणे बोलतो. तो म्हणतो, नको ती गोष्ट केल्यासारखी, वाळवंटात स्पर्धा घ्यायलाच हवी होती का? पहिल्याच दिवशीच्या उकाड्यात अ‍ॅथलिट्स दगावले नाहीत हे नशीब! अनेक प्रश्नांच्या कात्रीत सापडलेले कतारी संघटक मात्र कधी एकदा उरलेल्या दीर्घपल्ल्याच्या शर्यती लवकर उरकतायत इथंच नजर ठेवून आहेत. त्या दृष्टीनं ४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता दोहात (आपल्याकडे ५ ऑक्टोबरला सकाळी २ वाजता) पुरुषांची २० किमी.चालण्याची शर्यत आणि ५ ऑक्टोबरला रात्री ११: ५९ वाजता दोहात (आपल्याकडे ६ ऑक्टोबरला सकाळी २: २९ वाजता) सुरू होणारी पुरुषांची मॅरेथॉन शर्यत या दोन शर्यतींकडे अ‍ॅथलेटिक्स शौकीन विशेष लक्ष ठेवून असतील.

अ‍ॅथलेटिक्स शौकिनांच्या रागाचा अधिक सामना करावा लागू नये म्हणून शनिवार-रविवार या शेवटच्या दोन दिवशी स्टेडियममध्ये प्रेक्षक वाढवण्याचं कामही जोरात हाती घेण्यात येणार आहे असं समजतंय. अखेर, कतारला वाळवंटात जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाशर्यती यशस्वी करून दाखवल्याची फुशारकी मिरवायची आहे ना!

–उदय ठाकूरदेसाई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -