घरक्रीडापावसामुळे कांगारूंचा विजय हुकला

पावसामुळे कांगारूंचा विजय हुकला

Subscribe

पाकिस्तानविरुद्धचा पहिला टी-२० सामना रद्द

पावसाच्या व्यत्ययामुळे यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना रद्द करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ५ बाद १०७ अशी धावसंख्या उभारली होती. मात्र, डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला १५ षटकांत ११९ धावांचे आव्हान मिळाले. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची ३.१ षटकांत बिनबाद ४१ अशी धावसंख्या असताना पावसाला सुरुवात झाली. यानंतर पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावात ५ षटके पूर्ण न झाल्याने हा सामना रद्द करावा लागला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर फखर झमानला मिचेल स्टार्कने खातेही उघडू दिले नाही. तिसर्‍या क्रमांकावरील हॅरिस सोहेलला केन रिचर्डसनने ४ धावांवर बाद केले. त्यामुळे पाकिस्तानची दुसर्‍याच षटकात २ बाद १० अशी अवस्था झाली. मात्र, कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. डावखुरा फिरकीपटू अ‍ॅश्टन एगारने रिझवानला ३१ धावांवर माघारी पाठवत ही जोडी फोडली. बाबरने मात्र एक बाजू लावून धरली. पाकिस्तानच्या डावाच्या १३ व्या षटकात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना १५-१५ षटकांचा करण्यात आला. अखेरच्या २ षटकांत पाकिस्तानला फारशा धावा जोडता आल्या नाहीत. मात्र, बाबरने ३४ चेंडू आपले अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तानने १५ षटकांत ५ बाद १०७ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर १५ षटकांत ११९ धावांचे आव्हान होते. याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. खासकरून फिंचने फटकेबाजी करत अवघ्या १६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ३७ धावा केल्या. या डावाच्या चौथ्या षटकात पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. यानंतर पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही.

संक्षिप्त धावफलक – पाकिस्तान : १५ षटकांत ५ बाद १०७ (आझम नाबाद ५९, रिझवान ३१; रिचर्डसन २/१६, स्टार्क २/२२) वि. ऑस्ट्रेलिया : ३.१ षटकांत बिनबाद ४१ (फिंच नाबाद ३७).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -