घरक्रीडाIND vs NZ 1st Test: बळी पटकावण्यात भारतीय गोलंदाज अपयशी; दुसऱ्या दिवसाअखेर...

IND vs NZ 1st Test: बळी पटकावण्यात भारतीय गोलंदाज अपयशी; दुसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या सलामीवीरांची चमकदार कामगिरी

Subscribe

भारत आणि न्यूझीलंडच्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता १२९ धावा केल्या आहेत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता १२९ धावा केल्या आहेत. सलामीवीर विल यंगने १८० चेंडूत ७५ धावा तर टॉम लॅथम १६५ चेंडूत ५० धावांवर खेळत आहे. भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या होत्या. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने भारताकडून सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली. पहिल्या डावाच्या आधारावर न्यूझीलंडचा संघ सध्या भारतापेक्षा २१६ धावांनी पिछाडीवर आहे.

भारतीय संघाने शुक्रवारी ४ बाद २५८ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि ८७ धावांची भर घालत ३४५ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाच्या रूपात पहिला धक्का बसला. जडेजाला त्याच्या गुरूवारच्या धावसंख्येमध्ये एकही धाव जोडता आली नाही आणि ५० धावा करून तो बाद झाला. दरम्यान ऋद्धिमान साहा १ धाव काढून बाद झाला. यादरम्यान श्रेयसने कसोटीतील पदार्पणाच्या डावात शतक झळकावले.

- Advertisement -

श्रेयस अय्यरचे दमदार शतक

श्रेयस अय्यर भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा १६ वा फलंदाज ठरला आहे. सोबतच तो भारताचा तिसरा क्रिकेटर आहे ज्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात न्यूझीलंडविरूध्द शतक झळकावले आहे. पदार्पणाच्या सामन्यात शतक करणारा अय्यर १३ वा भारतीय खेळाडू बनला आहे. तर घरच्या मैदानावर हा कारनामा करणारा श्रेयस १० वा भारतीय क्रिकेटर आहे. त्याने १७१ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०५ धावा केल्या. तर अय्यरला १०५ धावांवर बाद करण्यात साउदीला यश आले.

टिम साउदीने ५ बळी पटकावले

पहिल्या डावात न्यूझीलंडकडून साउदी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. साउदीने पहिल्या डावात सर्वाधिक ५ बळी पटकावले. तर काइल जेमिसनला ३ तर एजाज पटेलला २ बळी घेण्यात यश आले.

- Advertisement -

न्यूझीलंडकडून शानदार फलंदाजी

प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने शानदार फलंदाजी केली. मात्र यावेळी नशिबानेही न्यूझीलंडच्या फलंदाजांची साथ दिली. लॅथम तीन वेळा डीआरएसवर बाद होण्यापासून वाचला. त्याचवेळी विल यंगलाही एकदा संधी मिळाली. मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी भारतीय गोलंदाजांना पहिल्या डावात चितपट केले. लॅथमने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २० वे अर्धशतक तर यंगने त्याच्या कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले.

न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी बनवला विक्रम

डिसेंबर २०१६ नंतर भारतात विपक्षी संघाच्या सलामीच्या जोडीची ही पहिली शतकीय भागीदारी आहे. याआधी चेन्नईमध्ये इंग्लंडचे सलामीवीर अॅलिस्टर कुक आणि कीटन जेनिंग्स यांनी दुसऱ्या डावात १०३ धावांची भागीदारी केली होती.
याशिवाय यंग आणि लॅथम ही जोडी भारताविरुद्ध कानपूरमध्ये शतकी भागीदारी करणारी तिसरी सलामीची जोडी ठरली आहे.

कानपूरमध्ये भारताविरुद्ध शतकीय भागीदारी करणारी सलामीजोडी

ग्रॅमी फॉलर-टिम रॉबिन्सन: १५६ धावा, १९८५
सिद्ध वेट्टीमुनी- रवी रत्नायके: १५९ धावा, १९८६
विल यंग-टॉल लॅथम: १२९*, २०२१


हे ही वाचा: AUS vs ENG Ashes Series : अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; अनिश्चित काळासाठी टीम पेनची क्रिकेटमधून माघार


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -