घरक्रीडाटी-२० स्पर्धा विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट...पुन्हा एकदा!

टी-२० स्पर्धा विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट…पुन्हा एकदा!

Subscribe

टी-२० क्रिकेट स्पर्धा विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट हा वाद मागील ८-१० वर्षे सुरू आहे. बर्‍याच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे ‘थकवणारे वेळापत्रक’ लक्षात घेऊन आपल्या देशाकडून खेळण्यापेक्षा विविध टी-२० स्पर्धांमध्ये खेळण्याला पसंती दिल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, सध्या कोणतीही टी-२० स्पर्धा सुरू नसताना हा विषय कशासाठी असा काहींना प्रश्न पडला असेल. कारण आहे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची खराब कामगिरी. या स्पर्धेत त्यांनी ३ पैकी ३ सामने गमावले आहेत. त्यातच अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला या विश्वचषकात खेळता येणार नाही. त्याला ही दुखापत जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळताना झाली होती. त्यामुळे द.आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसने स्टेनच्या दुखापतीसाठी आयपीएलला जबाबदार धरले.

या विश्वचषकासाठी द.आफ्रिकेच्या संघाची घोषणा होण्याआधी मागील वर्षी निवृत्त झालेल्या एबी डिव्हिलियर्सने निवृत्तीचा निर्णय मागे घेत विश्वचषकात खेळण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्याच्या या प्रस्तावाला द.आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने नकार दिला. याला कारण होते, डिव्हिलियर्स या एका वर्षात स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापेक्षा झटपट संपणार्‍या टी-२० क्रिकेटला पसंती दिली. द.आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांचे खराब प्रदर्शन पाहता याआधीच्या तीन विश्वचषकांत मिळून ६३.५२च्या सरासरीने १२०७ धावा करणारा डिव्हिलियर्स संघात असता, तर द.आफ्रिकेने किमान एक सामना जिंकला असता असे वाटते. मात्र, द.आफ्रिकन बोर्डाचा निर्णय अगदीच चुकीचा होता असे म्हणता येणार नाही. डिव्हिलियर्सला संघात घेतल्यामुळे एका वर्षात ज्या खेळाडूंनी द.आफ्रिकन संघासाठी घाम गाळला आहे त्यांच्यावर नक्कीच अन्याय झाला असता. या टी-२० स्पर्धांमुळे फक्त द.आफ्रिकेच्या संघाचे नुकसान झाले आहे का?, तर नाही.

- Advertisement -

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने २००७ सालचा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांना जणू टी-२० क्रिकेटचे वेडच लागले आणि यातूनच आयपीएलचा उगम झाला. २००८ मध्ये बीसीसीआयने सुरू केलेल्या या स्पर्धेची लोकप्रियता दरवर्षी वाढतच गेली आहे. त्यामुळेच इतर देशांमध्येही टी-२० स्पर्धांना सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा कमी कालावधी चालणार्‍या आणि जास्त पैसा मिळवून देणार्‍या या स्पर्धांचे खेळाडूंना आकर्षण वाटू लागले. याचा सर्वात वाईट परिणाम वेस्ट इंडिजवर झाला आहे. त्यांच्या खेळाडूंना या टी-२० स्पर्धांमध्ये मागणी वाढू लागली, परिणामी विंडीजमधील स्थानिक क्रिकेटचा दर्जा खालावला. टी-२० स्पर्धांमध्ये खेळत असल्याने किरॉन पोलार्डसारख्या खेळाडूला विंडीजच्या संघात स्थान मिळत नाही. त्याने यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत असताना संयमी ४१ धावा करत मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात संयमाने खेळण्याची गरज असताना पोलार्ड विंडीजच्या संघात असता तर त्यांनी हा सामना कदाचित जिंकला असता. त्यामुळे आयसीसी आणि विविध देशांच्या क्रिकेट बोर्डानी एकत्र येऊन यावर काहीतरी तोडगा काढणे गरजेचे आहे. अन्यथा या देशांचेच नाही तर क्रिकेटचेही नुकसान होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -